15 डिसेंबरपासून मुंबईतील सर्वसामान्यांसाठी लोकल, शाळा सुरू करण्याचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीनंतर देशात सर्वत्र कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. तज्ज्ञांनी थंडी आणि दिवाळीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा इशारा दिला आला आहे. हे रुग्ण न वाढल्यास डिसेंबरमध्ये मुंबईत सामान्यांसाठी लोकल आणि शाळा सुरू करण्याचे संकेत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

इक्बालसिंह चहल म्हणाले की, दिवाळीनंतर रुग्णवाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना वाढवल्या. त्यामुळे संसर्गाचा वेग रोखता आला आहे. सध्या दररोजची रुग्णसंख्या ९०० ते १००० पर्यंत असून, विविध रुग्णालयांत सुमारे ९६०० रुग्ण उपचार घेत आहेत. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क लावावा. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये. ही काळजी घेतली नाही, तर संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे तसे केल्यास आपण पुन्हा लॉकडाउन टाळू शकतो असे ते म्हणाले.

पुन्हा रुग्णवाढ झाली तरी पालिकेची आरोग्य यंत्रणा तोंड देण्यास सज्ज आहे. साडेबारा हजार खाटा सध्या रिक्त असून, त्यात आयसीयूच्या एक हजार खाटा उपलब्ध आहेत. जम्बो सुविधा असलेली नऊ कोरोना केंद्रे व रुग्णालये अद्याप बंद केलेली नाहीत. गरज पडल्यास ती पुन्हा सुरू करण्यात येतील.

तपासणीला चांगला प्रतिसाद
मुंबईमध्ये देश-विदेशातून येणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बुधवारपासून विमानतळ, रेल्वे स्थानके यासह जिथून बाहेरगावावरून येणारे प्रवासी यांची कोरोना चाचणी अहवाल किंवा नवीन चाचणी सक्तीची केली आहे. त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसू लागेल. बुधवारी सर्व ठिकाणी सुरू केलेल्या तपासणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असेही इक्बालसिंह चहल यांनी सांगितले.

सर्वसामान्यांसाठी लवकरच लोकलची सेवा
सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांनी गर्दी केली, त्यामुळे बाधितांची संख्या वाढली. गणपती काळात दिवसाला २ हजार ५०० रुग्ण आढळत होते. दिवाळी काळात ही संख्या आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. दिवाळीत नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. तसेच एकमेकांच्या घरी, एकत्रितपणे दिवाळी साजरी केली होती. मात्र, या काळात रुग्णसंख्या ९०० च्या आसपास असल्याने दिलासा मिळाला आहे. हे चित्र असेच राहिल्यास सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, गर्दीचे नियंत्रण करण्याचे प्लॅनिग करावे, कोरोना रुग्ण वाढल्यास जबाबदारी राज्याचीच असेल असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून राज्य सरकारने रेल्वेच्या मिळालेल्या उत्तरावर काहीच कारवाई केलेली नाही.