अमेरिकेतील शिकागोत अंधाधुंद गोळीबार, अंत्यसंस्काराला आलेले अनेकजण जखमी

शिकागो : वृत्तसंस्था –   शिकागोमध्ये झालेल्या अंधाधुंद गोळीबाराने अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी ही घटना घडली आहे. या घटनेत किमान 14 जण गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिकागो पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकागोमधील ग्रेशम येथे मंगळवारी संध्याकाळी एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरु होता. याच दरम्यान, वाहनातून आलेल्या एका व्यक्तीने तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 14 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असले तरी हल्लेखोराबाबतची अधिक माहिती पोलिसांनी दिली नाही.
शिकागो अग्निशमन दलाचे प्रवक्ते लैरी गँगफोर्ड यांनी सांगितले की, अग्निशमन विभागाने घटनास्थळावरून 11 जणांना रुग्णालयात दाखल केले. तर अन्य लोकांना इतर रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांच्यापैकी काही लोकांची प्रकृती चिंताजनक होती.

दरम्यान, ही घटना घडली तेव्हा गोळीबाराच्या अनेक फैरी झाडण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. आम्ही जागोजागी मृतदेह पडल्याचे पाहिले. त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार झाल्याचे दिसून येत होते. आम्हाला एकवेळ युद्धच सुरु झाल्याचा भास झाला, असे स्थानिक रहिवासी अर्निटा गर्डन यांनी सांगितले.