धक्कादायक ! खेळता- खेळता ६ वर्षाच्या मुलाच्या अंगात ‘कॉम्प्रेसर’ने भरली हवा ; मुलाचा दुर्दैवी मृत्यू

इंदौर : वृत्तसंस्था – घराजवळ खेळत असताना एका सहा वर्षाच्या मुलाच्या मित्रांनी कॉम्प्रेसरचा पाईप त्याच्या तोंडात घातला. कॉम्प्रेसरने पोटात हवा गेल्याने मुलगा जागेवर चक्कर येऊन पडला. हा प्रकार लक्षात येताच त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. कान्हा रामचंद्र यादव (वय-६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

रामचंद्र यादव हे इंदौर येथील भंवरकुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालदा परिसरात वास्तव्यास आहेत. यादव हे मुळचे खरगोन जिल्ह्यातील रहिवाशी असून कामानिमित्त ते पालदा येथे आले आहेत. याच ठिकाणी असलेल्या एका दाळ मीलमध्ये यादव यांचे कुटुंब कामाला आहे. त्यांच्यासोबत इतर काही कुटुंब देखील दाळ मीलमध्ये काम करत असून याच ठिकाणी ते राहतात.

घटनेच्या दिवशी कान्हा हा आपल्या इतर मित्रांसोबत खेळत होता. तर त्याचे वडील कामानिमित्त दाळ मीलच्या छतावर गेले होते. त्यावेळी कान्हा त्याच ठिकाणी मित्रांसोबत खेळत होता. खेळत असताना अचानक एका मुलाने दाळ मीलमध्ये ठेवलेल्या कॉम्प्रेसरचा पाईप कान्हाच्या तोंडात घातला. कान्हाच्या पोटात हवा गेल्याने त्याचे पोट फुगले आणि तो जागीच कोसळला. हा प्रकार समजताच नागरिकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

रामचंद्र यादव हा रोजगाराच्या शोधात इंदौर येथे आला होता. या ठिकाणी असलेल्या दाळ मीलमध्ये त्याला काम मिळाले होते. मात्र, काम करत असताना त्याने आपल्या मुलाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने सहा वर्षाच्या कान्हाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच या ठिकाणी असलेल्या इतर कामगारांनी देखील आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही. जर सुरक्षेची काळजी घेतली असती तर कदाचीत कान्हाचा जीव वाचला असता.

आरोग्यविषयक वृत्त