निवडणुकीत प्रचारासाठी भाजप नेत्यांची ‘स्वारी’ घोड्यावर, ‘कोरोना’नं उमेदवारांचा काढला ‘घाम’

इंदूर : वृत्तसंस्था – देशभर कोरोनाचा उद्रेक सुरु असतानाच मध्य प्रदेशात विधानसभेच्या एका पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरु आहे. या ठिकाणच्या सांवेर विधानसभा मतदार संघामध्ये ही पोट निवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली नसली तरी भाजप आणि काँग्रेसने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्या लढत होत आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांना हरवण्यासाठी कंबर कसली आहे.

काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर काँग्रेसला भाजपचा पराभव करायचा आहे. कोरोनामुळे सध्या नागरिक बाहेर पडत नसल्याने मतदार संघात जायचे कसे आणि मतदारांना मतदानासाठी बाहेर कसं काढायचं असा प्रश्न इथल्या उमेदवार आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांना पडला आहे.

खुजरिया गावात रविवारी भाजपने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी भाजपचे नेते आणि खासदार शंकर ललवानी चक्क घोड्यावर बसून आले. सगळे लोक उत्सुकतेने त्यांच्याकडे पहात होते. सांवेर विधानसभा मतदारसंघात जलसंपदा मंत्री तुलसी सिलावट हे निवडणूक लढवत असल्याने भाजपसाठी ही जागा महत्त्वाची आहे. भाजपचे उमेदवार कोणत्याही परिस्थिती जिंकणारच असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. तर काँग्रेस घोड्यावर बाशिंग बांधून निघणाऱ्या उमेदवाराचा पराभव करणार असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.