मध्यप्रदेशात सरकार कोसळले तर आम्ही जबाबदार नाही : शिवराजसिंग चौहान

भोपाळ : वृत्तसंस्था – कर्नाटकात काँग्रेस जेडीएसचे सरकार पडल्यानंतर आता भाजपची नजर मध्यप्रदेश सरकारवर असणार असल्याचे संकेत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग यांनी दिले आहेत. शिवराजसिंग यांनी म्हटले की, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सरकार पडल्यास त्याला काँग्रेस जबाबदार असेल, आम्ही त्यास जबाबदार असणार नाही. त्यांनी म्हटले की, कमलनाथ सरकारमध्ये खूप अंतर्गत मतभेद आहेत आणि अशा परिस्थितीत सरकार पडल्यास त्याला काँग्रेस स्वतः जबाबदार असेल.

काँग्रेसचा पलटवार

कर्नाटक सरकार पडल्यानंतर आता मध्यप्रदेश सरकारला असाच धोका असल्याचा अंदाज बांधला जात आहे. शिवराजसिंग यांच्या या मतानंतर काँग्रेसने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. कमलनाथ सरकारमधील मंत्री जितू पटवारी यांनी म्हटले की, भाजप कडून सरकार पाडण्यासाठी प्रत्येक प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांनी म्हंटले की, हे कमलनाथ सरकार आहे, कुमारस्वामी सरकार नाही आणि हे सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करायला सात जन्म घ्यावे लागतील.

मध्यप्रदेशमध्ये कर्नाटक सारखी स्थिती?

मंगळवारी कर्नाटक विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत कुमारस्वामी सरकारचा पराभव झाला आणि कुमारस्वामी सरकार पडले. कुमारस्वामी सरकारला ९९ आमदारांचे समर्थन मिळाले. भाजपच्या बाजूने १०५ मते पडली. अशा परिस्थितीत मध्यप्रदेशचे सरकार देखील काठावरच आहे. भाजपाला मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस आमदार फोडण्यास यश मिळाल्यास मध्यप्रदेशमध्ये देखील कर्नाटक सारखी परिस्थिती निर्माण होऊन मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार पडू शकते.

आरोग्यविषयक वृत्त