इंदोरीकरांचे नोटीशीला वकिलांमार्फत उत्तर, म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वादग्रस्त विधान केल्यामुळे मागील काही दिवसापासून हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर हे चर्चेत आले आहेत. गर्भलिंग निदानाबाबत त्यांच्या वक्तव्यानंतर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या समितीने इंदोरीकर यांना नोटीस पाठवली होती. रुग्णालयाने पाठवलेल्या नोटीसीला इंदोरीकर यांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर दिले असून या उत्तराबाबत जिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांकडून सविस्तर माहिती देण्यास नकार दिला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या समितीने 12 नोव्हेंबरला इंदोरीकर महाराजांना त्यांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर येथील निवासस्थानी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नोटीस बजावली होती. या नोटिसीवरून गेल्या आठ दिवसांपासून वाद सुरु होता. याबाबत इंदोरीकर यांनी माफीनामा प्रसिद्ध केला होता. तसेच दिलगिरी व्यक्त केली होती.

दरम्यान, आज (बुधवार) दुपारी इंदोरीकर यांचे वकील शिवडीकर हे सेवकांसोबत जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यांनी रुग्णालयामार्फत देण्यात आलेल्या नोटिसीला लेखी उत्तर दिले आहे. नोटिसीला उत्तर देण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज शिवजयंतीनिमित्त सुट्टी असल्याने समितीचे प्रमुख तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर हे रुग्णालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे इंदोरीकर यांच्या वकीलांनी त्यांच्या कक्षात असलेल्या अधिकाऱ्याकडे लेखी खुलासा केला आहे. लेखी खुलासा केल्यानंतर इंदोरीकर यांचे वकील मागच्या दरवाजाने निघून गेल्याने याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. तसेच यावर डॉक्टरांनी देखील बोलण्यास नकार दिला आहे. पुढील दोन दिवसांत इंदोरीकर महाराज हे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे अ‍ॅड. शिवडीकर यांनी सांगितले.