इंदोरीकर महाराजांचा ‘यू-टर्न’, म्हणाले – ‘मी तसं बोललोच नाही’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आरोग्य विभागाकडे खुलासा सादर केला आहे. कीर्तनाच्या कार्यक्रमातील वक्तव्य त्यांनी अमान्य केले आहे. कीर्तनाच्या कार्यक्रमात आपण असे कुठेही बोललेलो नाही, असे त्यांनी नोटिशीवरील खुलाशात स्पष्ट केले आहे. तसेच यूट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंगदेखील करत नाही. मी तसं वक्तव्य केलं नाही असा दावा इंदोरीकरांनी केला आहे.

मी ते वाक्य बोललेलो नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात नगर जिल्ह्यात कीर्तन केलेलेच नाही. मी समाज प्रबोधन करत आहे. सरकारचे पुरस्कारही मिळालेले आहेत. यु ट्यूबला कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप आम्ही टाकत नाही, तसेच रेकॉर्डिंग देखील करत नाही, असे इंदोरीकर महाराज यांनी खुलाशात म्हटले आहे. इंदोरीकर महाराज यांनी खुलासा सादर करून वक्तव्य अमान्य असल्याचे म्हटले आहे.

इंदोरीकरांवर कारवाई होणार ?
इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मोठं रणकंद सुरु झालं. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई होणार का, यावर चर्चा सुरु आहे. याबाबत बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबिकर म्हणाले, इंदोरीकर महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी तसं बोललं नसेल तर उत्तर समाधानकारक आहे. मात्र, ज्या वर्तमानपत्रात इंदोरीकर महाराज यांनी अस वक्तव्य केल्याचं छापून आले आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाही नोटीस पाटवली आहे. तुम्ही कोणत्या आधारे असा दावा केला आहे. त्यांनी अद्याप उत्तर दिले नाही. त्यांनी पुरावे द्यावे. जो पर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत पुढे जाता येणार नसल्याचे मुरंबिकर यांनी सांगितले.