‘त्या’ वक्तव्यावरुन इंदूरीकर महाराजांनी 7 दिवसांनी मागितली ‘माफी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे वक्तव्य करून अडचणीत आलेले हभप निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी पत्राद्वारे महिलांची माफी मागितली आहे. समाजमाध्यमांत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे इंदूरीकर महाराज यांनी म्हटले आहे. मागील आठ दिवसांपासून इंदूरीकर महाराज चर्चेत आले होते. इंदूरीकरांना एका कीर्तनातून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

आता त्यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या कीर्तनातून श्रोत्यांना प्रोधन करत भागवत धर्माचे विवेचन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज हे एका कीर्तनातील वक्तव्यातून अडचणीत आले होते. यांनंतर त्यांच्या बाजूने आणि विरोधात अनेकांनी मते व्यक्त केली होती. मात्र, आता इंदूरीकरांनी माफी मागत भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत एक पत्र जारी केले आहे.
इंदूरीकर महाराजांनी आपल्या पत्रात महिलावर्गाची माफी मागितली आहे. तसेच 26 वर्षापासून मी कीर्तनरुपी समाजप्रबोधन करत आहे. त्यामुळं माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा करत माझ्या वक्तव्याचा विपर्य़ास केला जात असल्याचे इंदूरीकर महाराज देशमुख यांनी म्हटले आहे.

दरम्यान, इंदूरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार अपराध असून त्या बद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडीटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली होती. गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करुन कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात येणार होता.