इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज सत्र न्यायालयात सुनावणी

पोलिसनामा ऑनलाईन – किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावर आज संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीच्या वेळी अंनिसने हस्तक्षेप करण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. त्याला इंदोरीकरांच्या वकिलांनी आक्षेप घेतला असून आज न्यायालय हस्तक्षेप याचिका अर्ज स्वीकारणार की फेटाळणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

सम तारखेला स्त्रीसंग झाला तर पुत्रप्राप्ती होते, असे वक्तव्य किर्तनातून इंदोरीकर महाराजांनी केले होते. त्यानंतर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. दिवाणी न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून आज तिसरी सुनावणी होणार आहे. जानेवारी महिन्यात नवी मुंबईतल्या उरणमध्ये इंदोरीकरांनी हे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला आक्षेप घेत अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी पुणे जिल्ह्यातील उरण व नगर तालुक्यातील एका ठिकाणी आपल्या कीर्तनातून सम आणि विषम तिथीचे सूत्र मांडतांना त्यातून अपेक्षित संततीची प्राप्ती होते असे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करीत अंधश्रद्धा निर्मुलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.