इंद्रा नुयी वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत 

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – भारतात शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नुयी यांचा समावेश केला जातो. आता आणखी उंच भरारी घेत पेप्सिकोच्या माजी अध्यक्ष इंद्रा नुयी या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. व्हाइट हाऊस प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इंद्रा यांच्याशिवाय ट्रेझरी विभागो अधिकारी डेव्हिड मालपास आणि ओव्हरसीज प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे (ओपिक) अध्यक्ष रे वॉशबर्न यांची नावेही चर्चेत आहेत.
विद्यमान अध्यक्ष जिम याँग किम यांनी १ फेब्रुवारीपासून पदमुक्त होणार असल्याची अचानक घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांनी नवा अध्यक्ष शोधणे सुरू केले. तेव्हापासून या तिघांच्या नावांची चर्चा सुरू झाली. ऑक्टोबरमध्ये इंद्रा नुयी यांनी पेप्सिको कंपनी सोडली होती. मालपास हे परराष्ट्र मंत्रालयात ट्रेझरीचे अंडर सेक्रटरी आहेत. तर वॉशबर्न ऑगस्ट २०१७ पासून ओपिकचे अध्यक्ष आहेत. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत या तिघांची नावे आघाडीवर आहेत.
१९४९ पासून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड अमेरिका करते. किम यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या तीन वर्षे आधीच जागतिक बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा कार्यकाळ वर्ष २०२२ मध्ये संपणार होता. अनेक प्रकरणांमध्ये ट्रम्प प्रशासनाबरोबरील मतभेदामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीशी संबंधित असलेल्यांच्या निकटवर्तींय सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत आहे. सर्वसाधारणपणे अशा महत्त्वपूर्ण पदासाठीच्या नामांकनाबाबत अंतिम निर्णय होऊपर्यंत सुरुवातीचे दावेदार स्पर्धेतून बाद होत असतात.  मात्र या पदासाठी नामांकन झाल्यास इंद्रा नुयी या हे पद स्वीकारणार की नाही, याबाबत काही स्पष्ट होऊ शकलेले नाही.
भारतात जन्मलेल्या इंद्रा नुयी यांचा समावेश जगातील शक्तिशाली महिलांमध्ये केला जातो. १९९४ मध्ये पेप्सिको कंपनीत दाखल झालेल्या नुयी यांनी २००६ साली कंपनीचे नेतृत्व स्वीकराले होते. त्यांच्या कार्यकाळात पेप्सिकोच्या शेअरमध्ये ७८ टक्क्यांनी वाढ झाली. १२ वर्षे पेप्सिकोमध्ये काम केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.