‘इंद्रायणी थडी’ला पहिल्याच दिवशी अबालवृद्धांचा प्रतिसाद; ८५ हजारहून अधिक नागरिकांची हजेरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ जत्रा ‘इंद्रायणी थडी’ ला पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर दुपारच्या सत्रात जत्रेला सुमारे ८५ हजारहून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. त्यामुळे शनिवारी व रविवारी जत्रेत झुंबड उडणार असे चित्र निर्माण झाले आहे.

भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’ गावजत्रा मैदानावर भरविण्यात आली आहे. शिवांजली सखी मंचच्या पुढकाराने भरवलेली ही जत्रा दि.२ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत खुली राहणार आहे.

‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे यंदा दुसरे वर्ष आहे. तब्बल ८०० विविध स्टॉल उभारण्यात आले आहेत. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती, ‘रामायण’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘लेझर शो’, धर्मवीर संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, ग्राम संस्कृती, ऐतिहासिक फुले वाडा, रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा, बालजत्रा, शिवकालीन शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन, गड-किल्ले यांचे छायाचित्र प्रदर्शन, मर्दानी खेळ, फॅशन शो, नृत्य स्पर्धा आदी विविध उपक्रमांसह मनोरंजनाचे विविध खेळ आणि विशेष म्हणजे, तब्बल ३०० हुन अधिक विविध खाद्यपदार्थांची पर्वणी असलेल्या या जत्रेला नागरिकांचा प्रतिसाद लक्षणीय आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील विविध भागांत आयोजित केल्या जाणाऱ्या ‘इव्‍हेंट’पेक्षा भोसरीतील ‘इंद्रायणी’ थडी गर्दीचे ‘रेकॉर्ड ब्रेक’ करणार, असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे.

जत्रेला येणाऱ्या नागरिकांनी आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी. तसेच, मौल्यवान वस्तू शक्यतो सोबत ठेवू नयेत. खिसेकापू किंवा चोरट्यांपासून सावध रहावे. पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा वापर करावा. तसेच, काही संशयास्पद व्यक्ती अढळल्यास किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काही सूचना करावयाची असेल, तर तात्काळ मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन सुरक्षा विभागाचे प्रमुख कुंदन लांडगे यांनी केले आहे.

वाहतूक आणि सुरक्षा नियंत्रणासाठी ५८ जणांची टीम…
जत्रेला आलेल्या नागरिकांची आकडेवारी लक्षात यावी. याकरिता संयोजकांनी अत्याधुनिक सॉफ्टवेअरची मदत घेतली आहे. त्याद्वारे जत्रेच्या आवारात १० सीसीटीव्‍ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. त्याआधारे सुमारे ८५ ते ८८ हजारहून अधिक नागरिकांनी पहिल्या दिवशी (गुरूवार) जत्रेला भेट दिल्याचे निदर्शनास आले आहे. वाढती गर्दी लक्षात घेवून वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. तसेच, स्टॉलधारक आणि येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होवू नये. याकरिता सागर जगताप, अजित सस्ते, तुषार थोरात, सतीश जरे, मनोज काळे, सागर गडसिंग, संते लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली ५८ जणांची ‘टीम’ कार्यरत आहे, अशी माहिती संयोजन समितीचे प्रमुख संजय पटनी यांनी दिली.