शीना बोरा मर्डर केस : विशेष न्यायालयानं इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शुक्रवारी शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने चौथ्यांदा जामीन अर्ज केला होता. परंतु विशेष न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे. चार वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये शीना बोरा हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये तब्येतीचे कारण देऊन न्यायालयाकडे जामीन अर्ज केला होता परंतु तेव्हा ही न्यायालयाने तिची जामिनावर सुटका करण्यास नकार देऊन अर्ज फेटाळला होता. यावेळीही तेच कारण देत तिने जामिनावर सुटका करण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने २०१८ पासून आतापर्यंत परिस्थितीत कोणतेही बदल नाहीत, असे म्हणत तिचा जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दिला.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार इंद्राणी मुखर्जी यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. आणि यापुढे तिची तब्येत सुधारू शकत नाही. असे इंद्राणीच्या वकिलांनी न्यायालयात सांगून तिला जामीन देण्याची विनंती केली होती. परंतु वकिलांच्या या विधानावर सीबीआयच्या वकिलांनी आक्षेप घेतला आणि न्यायालयात सांगितले की, २०१८ पासून आतापर्यंत तिच्या परिस्थितीत बदल झालेला नाही. तिची तब्येत खालावल्याचे पुरावे देखील नाहीत. त्यामुळे तिचा जामीन अर्ज हा फेटाळण्यात यावा. त्यामुळे न्यायालयाने सीबीआयच्या वकिलांचे म्हणणे मान्य करत इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळला.

या प्रकरणाबाबत सीबीआयचे म्हणणे आहे की, शीनाची हत्या तिची आई इंद्राणी मुखर्जी हिने केली असून ही हत्या संपत्तीच्या वादातून झाली आहे. शीनाच्या हत्येप्रकरणी इंद्राणी व इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्ना, तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली होती. ड्रायव्हर श्यामवर राय हा माफीचा साक्षीदार झाला होता. पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल व शीनाचे प्रेमसंबंध असल्याकारणाने इंद्राणी मुखर्जीला ते मान्य नव्हते. कारण इंद्राणीला भीती होती की शीना ही संपत्तीमध्ये वाटा मागणार. आणि यामुळेच इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा हिची हत्या केली होती. इंद्राणीने एप्रिल २०१२ मध्ये हत्या केली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/