भुसावळ, दौंड येथे रेल्वेचा मेगा ब्लॉक, ७ गाड्यांवरती परिणाम, प्रवाशांचे होणार हाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- दौंड ते सोलापूर दरम्यान लोहमार्गाच्या देखभालीचे दुरुस्ती व इतर तांत्रिक कामांसाठी ३१ मे पर्यंत प्रत्येक शनिवार आणि रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पुणे ते सोलापूर दरम्यान धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ब्लॉकचा इतर गाड्यांवरही परिणाम होणार आहे. तसेच भुसावळ रेल्वे स्थानकावरही रेल्वेचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉकमुळ सात गाड्यावरती परिणाम झाला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

सोलापूर ते पुणे डेमु गाडी प्रत्येक शनिवार व रविवार कुर्डुवाडीपर्यंतच धावणार आहे. पुणे सोलापूर डेमु गाडी भिगवणपर्यंत धावणार आहे. पुणे ते हैद्राबाद एक्सप्रेस ही गाडी दर शनिवारी पुणे ते कुर्डुवाडीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ही गाडी कुर्डुवाडी स्थानकातून नियमित वेळापत्राकानुसार धावणार आहे. ही गाडी सोमवार ते बुधवार या दिवशी वेळापत्रकानुसार पुण्यातून सुटेल. हैद्राबाद-पुणे गाडीही दोन दिवस कुर्डुवाडीपर्यंत धावणार आहे.

दरम्यान, ६ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीमध्ये भुसावळ स्थानकावरही ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अजनी-पुणे एक्सप्रेस १६ एप्रिल, पुणे-अजनी १९ एप्रिल, पुणे-अमरावती १७ एप्रिल, अमरावती -पुणे १८ एप्रिल आणि हबीबगंज-धारवाड ही एक्सप्रेस गाडी १९ व २० एप्रिल रोजी धावणार नाही. तर पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस १९ पर्य़ंत पुणे ते नाशिक रोड स्थानकापर्यंत व भुसावळ पुणे एक्सप्रेस २० एप्रिलपर्यंत भुसावळ ते नाशिक रोड स्थानकापर्यंतच धावेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.