इंदुरीकर महाराजांचा ‘अंनिस’च्या हस्तक्षेपावर आक्षेप ! जाणून घ्या प्रकरण

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज पुत्रप्राप्तीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं अडचणीत सापडले होते. सध्या या प्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे. बुधवारी संगमनेर जिल्हा न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. जिल्हा सत्र न्यायालयात आज इंदुरीकर यांच्यातर्फे वकिलांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं (अंनिस) दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर आक्षेप घेतला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही संगमनेर जिल्हा न्यायालयात 18 सप्टेंबर रोजी होणार आहे.

सरकार पक्षासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं देखील इंदोरीकर महाराजांविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. या याचिकेवर इंदोरीकर यांच्या वकिलानं हरकत घेतली आहे. 18 सप्टेंबर रोजी याची पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणी न्यायालय नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अमुक दिवशी स्त्रीसंग केला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते असं वक्तव्य असलेला इंदुरीकर महाराजांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांनी हे वक्तव्य कुठं आणि कधी केलं याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनानं गुन्हा दाखल केला नव्हता.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा करत संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनानं इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संगमनेर कोर्टानं इंदुरीकर महाराज यांना समन्स बजावले असून त्यांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.