इंदुरीकर महाराजांना मिळाला मोठा दिलासा, जाणून घ्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यामध्ये सायबर सेलकडून इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाला आहे. आक्षेपार्ह किर्तनाचा कोणताही व्हिडिओ युट्यूबवर नसल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे सायबर सेलकडून सांगण्यात येत आहे.

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी ओझर येथे केलेल्या किर्तनात वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली होती. त्यावरून आरोग्य विभागाने त्यांना नोटिसही पाठवली होती. दरम्यान, आपण किर्तनात असे कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केले नव्हते असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते. त्यांचा वादग्रस्त किर्तनाचा कोणताही व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध नसल्याचा अहवाल सायबर सेलने दिला आहे. यापुढे त्यांना कोणतीही नवीन नोटीस पाठवण्यात येणार नसल्याची माहिती आहे.

आरोग्य विभागाने इंदुरीकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला इंदुरीकरांनी वकिलामार्फत उत्तर दिले होते. मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं किर्तन केलेच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी अहमदनगर जिल्ह्यात कीर्तनच केलं नाही. मी समाज प्रबोधन करत असल्यानं मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाले आहेत. युट्युबला आम्ही व्हिडिओ टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नसल्याचा खुलासा त्यांनी केला होता.