शिक्षकांची ‘खिल्ली’ उडवल्याने इंदुरीकर महाराजांवर शिक्षक संघटनांची ‘नाराजी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज सध्या चांगलेच चर्चेत आलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनंतर आता इंदुरीकर महाराजांवर शिक्षक संघटना देखील नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. इंदुरीकर महाराज यांची शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये शिक्षक वर्गात येऊन वेळ कसा वाया घालवतात ? असे म्हणत महाराजांनी थेट शिक्षकांवरच टीका केली आहे.

काय म्हणालेत नेमकं इंदुरीकर महाराज शिक्षकांबद्दल
शिक्षक ३५ मिनिटांच्या तासिकेत पाच मिनिटं तर शिक्षक वर्गात जाण्यासाठी घालवतात.
त्यानंतर फळा पुसायला पाच मिनिटं घालवतात.
आदल्या दिवशी काय झालं ते सांगायला आणखी पाच मिनिटं घेतात.
उरलेल्या वेळात उद्याच्या तासाला काय शिकणार हे सांगायलाही पाच मिनिटं घेतात.
त्यानंतर काय मग तास संपला हे सांगायचीच वेळ येते.

अशा प्रकारे शिक्षकांच्या शिकवण्यावर इंदुरीकर महाराजांनी चांगलीच टीका केल्याचे क्लिपमधून दिसून येते. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिक्षक संघटनेकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच इंदुरीकर हे स्वतः शिक्षक आहेत त्यामुळे त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलिन करू नहे असे काही शिक्षकांनी सुचवले आहे.

कोणत्याही कीर्तनाचा हेतू समाज प्रबोधन करणे हा असतो त्यासाठी कीर्तनामध्ये अनेक दाखले देखील दिले जातात याची संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र शिक्षकांवर अशा प्रकारे भाष्य करण्यापेक्षा इंदुरीकर महाराजांनी समाज प्रबोधनाकडे लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरणारे यांनी दिली आहे. तसेच अशा प्रकारे शिक्षकांची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करणे अयोग्य आहे असे मत अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरम, महाराष्ट्र संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केलं आहे.

ओझरमध्ये झालेल्या किर्तनात सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केल होतं. त्या पाठोपाठ आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाल्याने इंदुरीकर महाराजांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.