इंदुरीकर महाराज कायदेशीररित्या बाजू मांडणार, भक्त मंडळींना पत्रक काढून केलं आवाहन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख कीर्तनातून समाज प्रबोधन करत असतात. मात्र कीर्तनातील एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात’ असं महाराज एक कीर्तनात म्हणाले होते. त्या वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यांनी बोललेले ते वाक्य पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार अपराध असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस पाठवली आहे.

इंदोरीकर महाराजांवरील आरोपाचा त्यांच्या भक्तांनी निषेध केला आहे. तर दुसरीकडे काहीजण महाराजांचा विरोध करत आहेत. भक्तांनी “चलो नगर” अशी सोशल मिडियावर मोहीम राबवली होती. याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. 18 फ्रेब्रुवारीला सर्वजण अहमदनगर येथे इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ एकत्र येणार होते. मात्र काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करत भक्तांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. वारकरी संप्रदाय हा शांतताप्रिय आहे. मोर्चे काढू नका, आदोलन करू नका, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं वागू नका. आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहे. तरी आपण शांतता राखून सहकार्य करावे ही विनंती, असं त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

You might also like