… म्हणून अब्जाधीश रतन टाटांनी केलं नाही लग्न, स्वतः सांगितलं होतं ‘हे’ कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा आज ८३ वा वाढदिवस. रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ मध्ये सुरत मध्ये झाला होता. टाटा यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि एक विशेष स्थानही मिळवले. मात्र, संपूर्ण आयुष्यभर त्यांनी कुणाशीही लग्न केले नाही. असे नाही, की रतन टाटा यांनी कुणावर प्रेमच केले नाही.

त्यांच्या आयुष्यात एकदा नव्हे, तर तब्बल चार वेळा प्रेमाची एंट्री झाली होती. पण, कठीण काळापुढे त्यांच्या नात्याची दोर कमकुवत पडली. नंतर रतन टाटा यांनी पुन्हा कधीच लग्नाचा विचार केला नाही. तर आज आपण त्यांच्या लव्ह लाईफवर नजर टाकणार आहोत…

रतन टाटा यांनी टाटा समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. उद्योगांच्या बाबत रतन टाटांना मोठे यश मिळाले. परंतु, प्रेमाच्या बाबत ते अपयस्वी ठरले. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रतन टाटा म्हणाले होते, की ते सुद्धा प्रेमात पडले होते, मात्र ते आपल्या प्रेमाचे रूपांतर लग्नात करु शकले नाही. भविष्याचा विचार करता त्यांना वाटते, की अविवाहित राहणे हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले. कारण, लग्न केले असते, तर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली असती. पुढे त्यांनी असं म्हटलं, जर तुम्ही विचारलं, की मी कधी प्रेम केले होते, का? तर तुम्हाला सांगतो, की मी चार वेळा गांभीर्याने लग्नासाठी तयार झालो आणि प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने मागे सरकलो.

आपल्या प्रेमाच्या दिवसांबाबत बोलताना टाटा यांनी सांगितलं, अमेरिकेत काम करताना प्रेमाच्या बद्दल सर्वात गंभीर झालेलो. पण, मी पुन्हा भारतात आल्याने आम्ही लग्न करु शकलो नाही. त्यांच्या प्रेयसीला भारतात येण्याची इच्छा नव्हती. तेव्हाच भारत आणि चीन युद्ध सुरु होते. त्यांच्या प्रेयसीने अमेरिकेतील एका व्यक्तीशी लग्न केले. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करत होते, त्या अद्यापही शहरात आहेत का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘हो’ म्हणून त्यांनी उत्तर दिले. पण पुढे बोलण्यास त्यांनी नकार दिला.

दरम्यान, वयाच्या ७ व्या वर्षी पालक विभक्त झाल्याने रतन टाटांचा सांभाळ आजीने केला. रतन टाटा यांना कार्सची आवड असल्याने, त्यांच्या देखरेखीखाली टाटा सन्सने लॅंड रोव्हर, जागुआर, रेंजरोव्हर आपल्या समूहात घेतल्या. रिटायरमेंट झाल्यावर टाटा म्हणाले, मला माझे छंद पूर्ण करण्याची इच्छा आहे. त्याचसोबत मी पियानो वाजवणार आणि विमान उडवण्याचा माझा छंद पूर्ण करेन. भारत सरकारने रतन टाटा यांना पद्मभूषण (२०००) आणि पद्म विभूषण (२००८) ने सन्मानित केले.