ओढ्यावरील अतिक्रमणाचा सर्वसामान्य लोकांना फटका, उरुळी कांचन मध्ये घरात शाळेत पाणी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन –  ग्रामपंचायत व महसूल खात्याने दूर्लक्ष केल्याने उरुळी कांचन येथील ओढ्याची दुरावस्था झाल्याने काल सोमवारी रात्री अचानक आलेल्या पुराचे पाणी तुंबून येथील जनजीवन विस्कळीत झाले तर ओढ्याकाढच्या सर्वच भागात पाणी शिरले आणि घाणीचे साम्राज्य पसरले.

पुणे सोलापूर महामार्गावरील पुणे शहराचे उपनगर म्हणून उदयास येत असलेल्या उरुळी कांचन ता. हवेली येथील नागरी समस्यांचा बोजवारा उडाला असून रस्ते पाणी कचरा समस्या स्वच्छतेमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आल्याचे दिसते.तर ग्रामपंचायत प्रशासन नेमकी काय सेवा पुरवते हा अनुत्तरीत प्रश्न आहे.

उरुळी कांचन गावच्या मध्यवस्तीमधून एक मोठा ओढा वाहतो. यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने त्याची रुंदी कमी होत गेली एवढेच काय पण अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली भिंती उभारून अकुंचित केला. या ओढ्याला शिंदवणे डाळिंब या गावापासून पाण्याचा प्रवाह येतो. सोमवारी रात्री शिंदवणे डाळिंब तसेच पूर्व हवेलीत सर्वत्र जोरदार पाऊस पडला परिणामी पावसाचे पाणी ओढ्यात आले. मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्याला वाट मिळाली नाही कारण रेल्वे पुलाजवळ एक साकव आहे त्यात कचरा जलपर्णी वाढल्याने पाणी तुंबले. तसेच टिळेकरवाडी खामगांव कडे जाणार्या रस्त्यावर राजरोसपणे अवैध वाळू धुण्याचा धंदा बिनदिक्कत जावू आहे.वाळूतील माती सरळ ओढ्यात मिसळते.

रात्री पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पाणी पुढे जाऊ शकले नाही हे पाणी या भागात घरात शाळांमध्ये घुसले त्यामुळे आज येथे घाणीचे साम्राज्य पसरले. विशेष म्हणजे वाळू वाॅशिंग ठिकाणाहून केवळ दोनशे मीटरवर मंडलाधिकारी व तलाठी कार्यालयात आहे. अगोदर अरोग्याचे बारा वाजले असताना हे नैसर्गिक संकट त्यामुळे सर्वसामान्य माणूस पुरता बेजार झाला आहे. गावातील गाव पुढारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगत आहे.येणार्या विधानसभा निवडणुकीत येथील समस्यावर नागरिक आक्रमक झाले तर स्थानिक नेत्यांची चांगलीच गोची होणार यात शंका नाही.