धक्कादायक… गुप्तधनासाठी दोन वर्षाच्या चिमुकल्याचा बळी, दोन तांत्रिक गजाआड

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन

गुप्तधनासाठी दोन वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करुन त्याचा बळी दिल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यातील खंडाळा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाच्या घराजवळ राहणाऱ्या दोन तांत्रिकांना अटक केली असून त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

युग मेश्राम (वय-२) असे दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. सुनील बनकर आणि प्रमोद बनकर असे अटक करण्यात आलेल्या तांत्रिकांची नावे आहेत.

बुधवारी (दि. २२) युग हा घराजवळ खेळत होता. खेळताना अचानक बेपत्ता झाला होता. युगच्या घरच्यांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. अखेर युगच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठून युग बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांची तीन पथके तयार करुन युगचा शोध सुरु केला. मात्र, युग मेश्रामच्या घराजवळच असलेल्या एका तनशीच्या ढिगाऱ्यात काल (29 ऑगस्ट) त्याचा मृतदेह आढळला.

सुनील आणि प्रमोद बनकर यांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान युग याच्या केसामध्ये तीन भोवरे असल्याने त्याला चॉकलेटचं आमिष दाखवून हे आरोपी त्याला घेऊन गेले. युग मेश्राम याचे अपहरण करुन त्याची पूजा करुन हत्या केली. गुप्तधनाच्या लालसेपोटी युगचा बळी दिला असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सुनील आणि प्रमोद बनकरकडे केलेल्या चौकशीत युग मेश्रामाचा नरबळीच असल्याचं समोर आले आहे.