छापा टाकण्यापूर्वीच पोलीस ठाण्यातून मिळाली विकास दुबेला ‘रेड’ची ‘टीप’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कानपूरमधील बिक्रू खेडयात विकास दुबेच्या टोळीवर जो छापा टाकण्यात आला त्याची माहिती आधीच टोळीला मिळालेली होती, अशी माहिती याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या टोळीतील साथीदाराने पोलिसांना दिली. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिस ठार झाले होते. एका पोलिसानेच या छाप्याची माहिती दुबे टोळीला दिली होती असे आता स्पष्ट झाले आहे.

आरोपी दयाशंकर अग्निहोत्री याने जाबजबाबात पोलिस छाप्याची पूर्वकल्पना मिळाल्याच्या गौप्यस्फोट केला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तपासानंतर दिलेल्या माहितीनुसार, अग्निहोत्री याने जाबजबाबात या चकमकीच्या संदर्भात काही तपशील पोलिसांना सांगितला. अग्निहोत्री याने पोलिसांना सांगितले, की विकास दुबे याला चौबेपूर पोलीस ठाण्यातून फोन आला होता. तीन पोलिस ठाण्यांचे पथक बिल्होरचे परिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली दुबे याला अटक करण्यासाठी येत आहे.

हा फोन एका पोलिसाने केला होता. मध्यरात्रीनंतर हा छापा पडणार असल्याचीही आगाऊ सूचना दुबे टोळीला मिळाली होती. जेव्हा पोलिस कानपूर देहातमधील बिक्रू खेडयात छापा टाकण्यासाठी आले तेव्हा दुबे याच्या समवेत त्याचे 25 साथीदार उपस्थित होते. याप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकावर संशय असल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. चौबेपूर ठाण्याचे अधिकारी विनय तिवारी यांचे नऊ तास जाबजबाब घेण्यात आले. त्यांना निलंबित करुन लखनऊला नेण्यात आले आहे. चौबेपूर हे ठिकाण बिक्रू येथून 14 कि.मी अंतरावर आहे. एका ग्रामस्थाने दुबे याच्याविरोधात खुनाची तक्रार केल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबेच्या गुंडांनी त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिस पथकावर बेछूट गोळाबार केला होता. तो सुनियोजित कट होता हे स्पष्ट झाले.