पुण्यातील एका विद्यापीठासह राज्यतील तीन विद्यापीठे बोगस 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील उच्च शिक्षणाचे जाळे दाट होत असतानाच देशात बोगस विद्यापीठांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. महाराष्ट्रातील तीन शिक्षण संस्था बोगस असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने (U.G.C.) जाहीर केले आहे. यामध्ये पुण्यातील एका विद्यपीठासह राज्यतील अन्य दोन विद्यापीठांचा समावेश असून या तिन्ही संस्थावर महाराष्ट्र सरकारने योग्य ती कारवाई करावी, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने कळविले आहे. याबाबतची माहिती मनुष्यबळ विकासमंत्री सत्यपाल सिंग यांनी राज्यसभेत दिली.

ही आहेत राज्यातील बोगस विद्यापीठे
ज्या तीन शिक्षण संस्थांना बोगस जाहीर करण्यात आले आहे.  त्यात मुंबईतील दोन तर पुणे येथील एक संस्थेचा समावेश आहे. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन अ‍ॅण्ड नॅचरल हीलिंग आणि नॅशनल इन्स्टिट्यूट इव्हेंट मॅनेजमेंट या दोन्ही संस्था अंधेरी पश्चिमेला आहेत. दि इंडियन बोर्ड ऑफ हेल्थ एज्यूकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, ही संस्था पुण्यामध्ये आहे.

मनुष्यबळ विकासमंत्री सत्यपाल सिंग यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्रातील तीन विद्यापीठे बोगस असून या निर्णयाच्या आधारे या तिन्ही संस्थावर महाराष्ट्र सरकारने योग्य ती कारवाई करावी, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने आदेश दिले आहेत. तसे पत्रच आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव, शिक्षण सचिव आणि प्रधान सचिव यांना पाठविले आहे.’

केंद्रीय विद्यापीठातर्फे दरवर्षी देशभरातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार यूजीसीकडून यादी तयार केली जाते. यापूर्वीच यूजीसीने नागपूर येथील राजा अरेबिक यूनिव्हर्सिटीला बोगस जाहीर केले होते. बिहार, दिल्ली, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, ओडिशा, पाँडेचरी अशा ९ राज्यांमधील एकूण २४ विद्यापीठे तसेच शिक्षण संस्था यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने बोगस म्हणून जाहीर केले आहे.

२०१६ साली देशात २१ वर मर्यादित असलेली बोगस विद्यापीठांची संख्या यंदा २४ वर पोहोचली आहे. यात प्रामुख्याने राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक बोगस विद्यापीठे असल्याचे केंद्रीय अनुदान आयोगाने (यूजीसी)  जाहीर केलेल्या बोगस विद्यापीठांच्या यादीतून स्पष्ट झाले आहे.