‘मायबोली’च्या सक्षमीकरणासाठी ‘मातोश्री’वरून सूचना

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राची अस्मिता मराठी भाषेचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने मनपा शाळांमध्ये वाचन संस्कृती अभियान राबविण्याची सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादसह मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिकांना केली आहे.

मुंबईत मातोश्रीवर झालेल्या यासंबंधीच्या बैठकीत प्राथमिक व माध्यमिक शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवून वाचन संस्कृती वाढविण्याच्या उपक्रमाची रूपरेषा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडली.

मराठी भाषा सक्षमीकरणासंदर्भात राज्यातील शिवसेनेचे महापौर असलेल्या चार महापालिकांचे महापौर व शिक्षणाधिकारी यांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतली. या बैठकीला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, लक्ष्मीकांत देशमुख यांची उपस्थिती होती. बैठकीला औरंगाबादहून महापौर नंदकुमार घोडेले, शिक्षणाशिकारी श्रीकांत कुलकर्णी, कार्यक्रमाधिकारी ज्ञानदेव सांगळे यांची उपस्थिती होती.

मराठी भाषा सक्षमीकरणासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन संस्कृती अभियान शालेय स्तरावर राबविण्यासंदर्भात या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. लक्ष्मीकांत देशपांडे हे ८ जानेवारीला औरंगाबाद दौऱ्यावर असून ते मनपा शाळांची तपासणी करणार असून आवश्यक त्या सूचना देणार असल्याचे शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी सांगितले.