वैद्यकीय सुविधांच्या अंदाजासाठी ‘कोरोना’ रुग्णांची माहिती 3 प्रकारात मिळावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   महापालिकेच्या दैनंदिन अहवालातून मिळणारी कोरोनाबाधितांची संख्या एकत्रितपणे न देता त्यातील होम आयसोलेशनमध्ये किती? रुग्णालयात किती? आणि कोविड सेंटर्समध्ये किती? अशा स्वतंत्र रितीने मिळावी म्हणजे त्या माहितीच्या आधारे कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी वैद्यकीय यंत्रणा किती सुसज्ज आहे ते समजायला मदत होईल अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केली आहे.

सध्या महापालिकेचा जो दैनंदिन अहवाल प्रसिद्ध केला जातो त्यात नवे रुग्ण, गंभीर रुग्ण, मृत्यू, प्रत्यक्ष उपचार घेणारे रुग्ण अशी एकत्रित माहिती देण्यात येते. त्या अहवालातील माहितीत प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांमध्ये होम आयसोलेशनमधील किती? रुग्णालयात किती? आणि कोविड सेंटर्समध्ये किती? अशाप्रकारे विभागून माहिती मिळाली तर रुग्णालयातील व्हेंटिलेटर्स, आयसीयू बेड्स याची नेमकी माहिती मिळेल आणि त्यादृष्टीने रुग्णांसाठी नेमकी वैद्यकीय व्यवस्था उभारणे शक्य होईल.

वैद्यकीय यंत्रणेला अधिक चालना देण्यासाठी तीन जंबो कोविड सेंटर्स उभारण्यात येत आहेत. ही सेंटर्स उभारताना रुग्णांची नेमकी माहिती संकलित केली जावी त्या माहितीचे पृथक्करण केले जावे. तसे न झाल्यास वैद्यकीय सुविधा देताना पुन्हा त्रुटी रहातील. सेंटर उभारण्यासाठी जनतेचा पैसा खर्च होणार आहे. त्रुटींपायी त्या पैशांचा अपव्यय होऊ नये यासाठी ही सूचना करीत आहे असे शिरोळे यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.