मतीमंद, अपंगांना डांबून अमानवी वागणूक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- वांगदरी परिसरातील गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व श्रीगोंदा पोलीस गेले. तेथे गावठी दारू, कच्चा रसायनांसह तिघांना अटक केली. मात्र तेथे धक्कादायक प्रकार आढळला. मतिमंद व अपंगांना डांबून ठेवत त्यांच्याकडून काम करून घेतले जात होते. त्यांच्यासोबत अमानवी वर्तणूक केली जात होती. डांबलेल्या व्यक्तींना दौंड व श्रीगोंदा रेल्वे स्टेशन येथून बळजबरीने उचलून आणले होते.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वांगदरी शिवारातील पारखे मळा येथे गावठी दारू अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून आज श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर.पी. खंडागळे, सहाय्यक फौजदार नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, मच्छिंद्र बर्डे, विनोद मासाळकर, संभाजी कोतकर आदींचे पथक तेथे गेले. गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून कैलास जब्बार गिऱ्हे, करतारसिंग नरहरी गिऱ्हे, विलास सोनाजी गिऱ्हे (सर्व रा. वांगदरी शिवार, पारखेमळा, ता. श्रीगोंदा) या तिघांना पकडले. त्यांच्याकडून गावठी हातभट्टीची दारु व दारु तयार करण्याचे रसायण मिळून आले.

सदर छाप्याची प्रक्रिया सुरु असताना वेगळाच प्रकार लक्षात आला. काही अपंग , मतीमंद लोकांना श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर व दौंड रेल्वे स्टेशनवर भिक मागत असताना त्याचे इच्छेविरुध्द पकडून आणून डांबून ठेवल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून जास्त श्रमाचे काम करवुन घेवुन त्यांना मोबदला दिला जात नव्हता. त्यांचे इच्छेविरुध्द काम करण्याची सक्ती करून अमानवीय वागणूक दिली जात होती. कैलास जब्बार गिऱ्हे याचे घराजवळ दोन परप्रांतीय इसम मिळून आले. करतारसिंग नरहरी गिऱ्हे याचे घराजवळ दोन परप्रांतिय इसम मिळून आले. विलास सोनाजी गि-हे याचे घरा जवळ दोन इसम मिळून आले. अशा सहा जणांची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भादंवि कलम 342, 374, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटकेची कार्यवाही करण्यात आली आहे.

गुलामाप्रमाणे दिली जात होती वागणूक
डांबून ठेवलेल्या 6 जणांची चौकशी केली असता समजले की, दौंड रेल्वे स्टेशन व श्रीगोंदा रेल्वे स्टेशन येथे भिक मागत होते. त्यांना बळजबरीने तेथून घेऊन आले होते. त्यांचेकडून शेतीची कामे, गुरे सांभाळण्याचे कामे जबरदस्तीने करुन घेत होते. कोठेही जाऊ देत नव्हते. पहारा ठेवत होते. पोटभर जेवणही देत नव्हते. गुलामप्रमाणे वागणूक दिली जात होती.