Nagpur News : अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या नवविवाहित पत्नीचा निर्घृण खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी एमआयडीसी परिसरातील भीमनगरमध्ये उघडकीस आली आहे. घटनेची माहिती समजताच परिसरात खळबळ उडाली आहे. दिप्ती अरविंद नागमोती (वय-26) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तिचा पती आरोपी अरविंद अशोक नागमोती (वय-30) हा फरार झाला आहे.

मूळचा चंद्रपूरचा रहिवासी असलेला अरविंद नागपूर येथे एमआयडीसीमध्ये कामाला होता. अरविंद आणि दिप्ती यांचा विवाह काही महिन्यापूर्वी झाला होता. सध्या ते भीमनगर परिसरात खोली भाड्याने घेऊन रहात होते. आरोपी अरविंद याचे लग्नापूर्वी एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. लग्ना झाल्यानंतरही तो तिच्या संपर्कात होता. दोन आठवड्यापूर्वी पती अरविंद याचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मयत दिप्ती हिला समजली होती. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर याच कारणावरुन दोघांमध्ये सारखे वाद होऊ लागले. अनैतिक संबंध तोडल्याशिवाय घरात यायचे नाही, असा पवित्रा दिप्तीने घेतल्याने रविवारी सकाळपासून त्यांच्यात वाद सुरु होते. दोघांपैकी कोणीच नमते घेत नसल्याने दोघांमध्ये दिवसभर भांडण सुरु होते.

दरम्यान, अरविंदचे अनैतिक संबंध असल्याची माहिती दिप्तीने माहेरच्यांना सांगितली होते. त्यामुळे दोघांना समजवण्याच्या हेतून दिप्तीचा भाऊ शुभम वामनराव ठाकरे (वय-20 रा. कुरखेडा), आरोपी अरविंदचे वडील आणि आणखी एक नातेवाईक रविवारी दुपारी नागपूला निघाले. प्रवासात शुभमने दिप्तीला फोन केला परंतु तिने फोन उचलला नाही. त्यामुळे त्याला शंका आली. दिप्तीने आपले बरेवाईट तर करुन घेतले नाही ना, अशी शंका त्याला आली.

सोमवारी पहाटे शुभम आणि त्याचे सोबत आलेले नातेवाईक दिप्ती रहात असलेल्या भीमनगर येथील घरी पोहचले. तेव्हा दारात पाय ठेवताच शुभमची शंका खरी ठरली. दिप्ती पलंगावर पडून होती. तिच्या नाकातोंडातून रक्त वाहत होते. तर आरोपी अरविंद हा कुठेच दिसला नाही. त्यामुळे शुभमने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शुभमच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अरविंद विरोधात गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे.