‘इंद्रायणी’चे चित्र पालटण्यासाठी पुढाकार घेणार : नाना पटोले

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी मुंबई इथं संबंधित विभाग व स्थानिक प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत हा प्रश्न तात्काळ मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी दिलीय.

तसेच या बैठकीत तीर्थक्षेत्र अलंकापुरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रलंबित असलेला दर्शनबारीचा प्रश्न निकाली काढण्याचाही प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

नाना पटोले यांनी शुुक्रवारी (दि. 4) रात्री उशिरा यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त विकास ढगे पाटील, योगेश देसाई, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, राहुल चिताळकर, हभप चैतन्य कबीर, व्यवस्थापक माऊली वीर आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित तसेच बहुचर्चित असलेल्या दर्शनबारी आरक्षणाच्या जागेवर जाऊन नानासाहेब पटोले यांनी पाहणी केली आहे. त्यानंतर भक्ती सोपान पुलावरून इंद्रायणी नदीची पाहणी केली. मात्र, पवित्र इंद्रायणीची सध्याची झालेली अवस्था पाहून त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. इंद्रायणी प्रदूषणमुक्त व्हावी, या भावनेतून लवकर संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून तिचं पावित्र्य जोपासण्यासाठी पुढाकार घेणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मंदिरामध्ये आळंदी विकास आराखड्याबाबत त्यांनी आढावा बैठक घेतली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी वारीत आवश्यक ती खबरदारी घेऊन सोहळा पार पाडण्याच्या सूचना पटोले यांनी देवस्थान समितीला दिल्या आहेत. अखेर आळंदीमधील कबीर मठाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.