जलयुक्तच्या कामात अडीच कोटींची हेराफेरी, 138 मजूर सहकारी संस्थेवर गुन्हा दाखल 

बीड : पोलीसनामा आॅनलाईन-

मोठा गाजावाजा करत राज्यात  जलयुक्त शिवारच्या कामाची सुरुवात केली होती. मात्र खुद्द मंत्र्याच्या तालुक्यातच जलयुक्तच्या कामात अडीच कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. आता तालुक्यात जलयुक्तच्या कामात गैरव्यवहार करुन पैशाचा अपहार करणे, फसवणूक करणे यावरुन बीड जिल्ह्यातील तब्बल 138 मजूर  सहकारी संस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e4d7a8e-7bab-11e8-8aa1-cdfcb0a347fb’]

कृषी अधिकारी आणि मजूर कंत्राटदारांनी एकमेकात संगणमत करुन, कृषी बोगस कामं दाखवून 2 कोटी 41 लाख 636 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कृषी कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये आष्टी, पाटोदा, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, धारुर या तालुक्यातील 138 मजूर सहकारी संस्थांचा समावेश आहे.

परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे मंजूर करण्यात आली होती. त्यामधील काही कामामध्ये गैरव्याहार झाला तर काही ठिकाणी कामे न करता पैसे उचलले, अशाप्रकारची तक्रार पुण्यातील कृषी आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानंतर विशेष तपास पथकाने परळी तालुक्यात प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन तक्रारीची खातरजमा केली असता, कामं न करता बोगस बिलं उचलल्याचे समोर आले होते. यावरुन अंबाजोगाई कृषी कार्यालयाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.