Latur News : उदगीर, निलंगा आणि उमरगा लगतच्या भागातील 865 गावांतील मराठी भाषिकांवर अन्याय, विविध सवलतींसाठी महाराष्ट्र शासनाला साकडे

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावामधील मराठी भाषिक बांधवांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असून, त्याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावे. सीमाभागातील विद्यार्थ्यांना ईबीसी सवलतीसह विविध सुविधा पूर्वीप्रमाणेच द्याव्यात, शालेय शिक्षण, उच्च शिक्षणासाठी दिलेल्या आरक्षणाची टक्केवारी वाढवावी, तसेच या गावातील नागरिकांना राज्य शासनाच्या सर्व सवलती, सोयी व अधिकार द्यावेत, अशी मागणी बिदर जिल्ह्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रामराव राठोड बोंथीकर यांनी केली आहे. दरम्यान बेळगाव, बिदर, भालकीसह 865 गावांना महाराष्ट्रात यायचे आहे. त्यासाठी तब्बल 62 वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा सुरु आहे.

सीमाभागातील उदगीर, निलंगा, उमरगा या तालुक्यांचा बराच मोठा भाग कर्नाटकातील औराद (संतपूर), भालकी, हुमनाबाद आणि बसवकल्याण तालुक्याला जोडला गेला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांचा भूभाग आजतागायत कर्नाटकात आहे. 1951 च्या शिरगणतीप्रमाणे बिदर जिल्ह्यात 39 टक्के मराठी भाषिक तर कानडी 28 टक्के, तेलुगू 15 टक्के, उर्दू 15 टक्के व इतर 13 टक्के असे प्रमाण होते. आजही या भागातील बहुतांश मराठी बांधवांवर अन्याय होत आहे. त्यामुळे न्याय्य हक्कासाठी जनतेच्या लढ्याची महाराष्ट्राने दखल घ्यावी, अशी मागणी करीत महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र शासनाला निवेदन दिले आहे. सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांसाठी वाचनालय, एकीकरण समितीच्या पदसिद्ध पदाधिकाऱ्यांना मुंबई दौऱ्याच्या वेळी आमदार निवासात राहण्याची व्यवस्था करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.