पोलिस उपनिरीक्षकाच्या 650 जागांची जाहिरात रद्द करण्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात एमपीएससी अंतर्गत निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या ६५० जागांच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि माजी आमदार रामराव वडकुते यांनी या जाहिरातीत राखीव प्रवर्गाच्या जागांमध्ये आरक्षणानुसार जागा देण्यात आलेल्या नाहीत म्हणून राज्य सरकारकडे ही जाहिरात रद्द करण्याची मागणी केली आहे.

राज्यात ६५० पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी एमपीएससी अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यामध्ये शासनाच्या नियमानुसार भटक्या जमाती (ड) वर्गासाठी २ % आरक्षण असताना त्यांना एकही जागा देण्यात आली नाही. यामध्ये तातडीने सरकारने लक्ष घालावे आणि उमेदवारांवर झालेला अन्याय दूर करुन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी अशी मागणी करणारी पोस्ट पंकजा मुंडे यांनी फेसबुक वरती केली आहे.

पोलीस उपनिरीक्षकाच्या ६५० जागांपैकी केवळ १ जागा धनगर समाजाला देण्यात आली आहे. धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण देण्यात येतं, मग एमपीएससीतील कोणता अधिकारी असा आहे की त्याचं गणित ६५० पैकी १ जागा धनगर समाजाला देण्यात आली. किमान २३ -२४ जागा ह्या धनगर समाजातील युवकांसाठी देण्यात येऊ शकतात, असं म्हणत माजी आमदार रामराव वडकुते यांनीही राज्य सरकारचं लक्ष वेधलं आहे.

आरक्षणाचा प्रश्न लावून धरताना वंजारी समाजाबरोबर ओबीसीचं नेतृत्व हे पंकजा मुंडेंनी केलं आहे. त्याचबरोबर भटक्या समाजावरील या अन्यायाची दखल शासनापर्यंत पोहचवावी असं वडकुतेंनी सांगितले आहे. राज्यात पोलीस उपनिरीक्षकाच्या ६५० जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी १९५, खेळाडूंसाठी ३२ तर अनाथांसाठी ६ पदे आरक्षित आहेत.