राज्यातील पहिल्या चारा छावणीवर अन्याय !

अहमदनगर: पोलिसनामा ऑनलाईन – स्वखर्चातून सुरू केलेल्या पाथर्डी तालुक्यातील पहिल्या स्वाभिमानी चारा छावणीवर प्रशासनाकडून अन्याय होऊ लागला आहे. तीन महिन्यापूर्वी सुरू केलेल्या या छावणीला टाळून प्रशासनाने इतर छावण्यांना मंजुरी दिली आहे. कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळत नसल्याने या छावणी चालकाचे मोठे हाल होऊ लागले आहेत.

उभा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत होरपळत होता. पाथर्डी तालुक्यामध्ये भयंकर अशी दुष्काळी परिस्थिती होती. त्याच परिस्थितीमध्ये शरद मरकड या तरूणाने राज्यातील पहिली लोकसहभागातुन जनवारांची छावणी नोव्हेबंर मध्ये सुरू केली होती. आज जवळपास या स्वाभिमानी चारा छावणीला सुमारे तीन महिने पूर्ण झालेत. या छावणीमध्ये सध्या जवळपास २५० जनावारे दाखल होते. शरदला रोजचा खर्च जवळपास १४ हजार रूपये चाऱ्यासाठी लागतात. पाण्यासाठी दोन हजार व तर इतर दोन ते तीन हजार रोजचे लागतात.

शासनाने या विनाअनुदानित चारा छावणीला मान्यता देणे गरजेचे होते. मात्र सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या छावण्यांना मान्यता दिल्या गेल्या. प्रशासन व सत्ताधारी नेत्यांनी या छावणीचा तर पत्ताच कट केला. शरद मरकड हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाथर्डी तालुक्याचा अध्यक्ष आहे. वेळावेळी आंदोलन करून काहीच हातात पडत नाही. म्हणुन ही छावणी सुरू केली. मात्र आता शासन मान्यतेच्यावेळी त्याच्या छावणीवर अन्याय झाल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे.

हेही वाचा – पंतप्रधानांना पुलवामापेक्षा जाहीरसभा महत्वाची : शरद पवार

‘..तर जमीन विकून छावणी चालवीन’

याबाबत बोलताना शरद मरकड  म्हणाले की, जर आमदार, पालकमंत्री यांच्या शिफारशी जर छावण्या मंजुर करण्यासाठी लागत असेल, तर जमीन विकून छावणी पाऊस पडेपर्यंत चालवीन, पण त्यांच्या दारात शिफारशीसाठी कधी जाणार नाही. मी स्वाभिमानाने तीन महिने छावणी चालवली आहे. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं ज्या छावणीत अजून एकही जनावर दाखल नाही, त्या छावणीला मान्यता दिली जाते. मी २५० जनावारे सांंभाळतोय तरी मान्यता दिली गेली नाही. शासनाने नव्हे, तर या छावणीतील शेतकऱ्यांच्या जनावरांवर अन्याय केला आहे.