11 वर्षाच्या मुलीनं दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर धक्कादायक माहिती उघड

पोलीसनामा ऑनलाईन – एका 11 वर्षाच्या मुलीची तब्येत अचानक बिघडल्याने रविवारी तिला घरच्यांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांना ती गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तीला प्रसूतीसाठी दुस-या रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सोमवारी पीडितेला उम्मेद रुग्णालयात केले असता त्याठिकाणी तिने एका मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर तीने आपल्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला तेंव्हा त्यांना धक्काच बसला. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात हे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 9 महिन्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करणा-या आरोपीला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

अरविंद मेघवाल (वय 30) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एएसपी दीपक शर्मा म्हणाले की, 11 वर्षांची मुलगी इयत्ता 6 ची विद्यार्थिनी आहे. सुमारे 8 ते 9 महिन्यांपूर्वी शेजारी राहणा-या 30 वर्षीय अरविंद मेघवालने मोबाइल दाखवण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार करून तिथून निघून गेला होता. भीतीपोटी मुलीने कुटुंबीयांना त्याविषयी माहिती दिली नाही. रविवारी तिची तब्येत बिघडली आणि कुटुंबीयांनी तिला प्रथम स्थानिक रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांना तिच्या गर्भधारणेबद्दल कळाले आणि यानंतर पीडितेला उम्मेद रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिने मुलाला जन्म दिला आहे.

या प्रसूतीनंतर मुलगी व तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. रुग्णालय प्रशासनाने ही माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर कुटुंबीयांनी रूग्णालयात पोहोचून लेखी तक्रार दिली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आरोपी अरविंदला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरोधात भादंवि कलम 376 ए आणि 376 बी तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. भोपाळगडचे डीएसपी धर्मेंद्र दुकिया या प्रकरणाचा तपास करत आहेत.