उदयनराजेंना मोठा दिलासा ! ‘खंडणी’ आणि ‘मारहाण’ प्रकरणातून निर्दोष मुक्तता

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना खंडणी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. लोणंद येथील सोना अलाईन्स कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणात उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांची सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. उदयनराजे भोसले आणि इतर 12 जणांवर 2017 मध्ये सोना अलाईन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण करून 24 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप होता.

सोना अलाईन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांनी याप्रकरणी 23 मार्च 2017 रोजी उदयनराजे भोसले यांच्यासह 9 जणांविरोधात तक्रार दाखल केली. आज (दि.27) सातारा जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणावर अंतिम सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणात उदयनराजे यांच्यासह सर्व आरोपींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

काय आहे प्रकरण ?
सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे सोना अलायन्स नावाची लोखंडाच्या भुकटीपासून विटा तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीमध्ये उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांची माथाडी संघटना आहे. तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर करतात. ही कंपनी रामराजे निंबाळकर यांच्या कामगार संघटनेला झुकते माप देते, असा आरोप उदयनराजे यांनी केला होता. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2017 मध्ये उदयनराजे यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घतेले. या ठिकाणी उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण करून ऐवज काढून घेतला अशी तक्रार राजकुमार जैन यांनी सातारा पोलीस ठाण्यात केली. त्यांच्या तक्रारीवरून उदयनराजे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर खंडणी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर 23 मार्च 2017 रोजी सातारा पोलिसांनी 9 जणांना अटक केली. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर उदयनराजे अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. काही दिवसांनी उदयनराजे हे साताऱ्यात आले. त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रोड शो केला. त्यानंतर ते पुन्हा गायब झाले. काही दिवसांनी ते स्वत: सातारा पोलिसांसमोर हजर झाले.