‘तर फडणवीसांचे आम्हाला कौतुक वाटलं असतं, त्यांची निष्ठा महाराष्ट्रातील जनतेशी नाही तर केंद्रातील नेत्यांशी’

मुंबई : वृत्तसंस्था – राज्याकडून पॅकेजच मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीवरून महाराष्ट्रासाठी पॅकेज आणलं असतं, तर आम्हाला कौतुक वाटलं असतं. मात्र, त्यांनी तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याऐवजी PMCares ला मदत केली. त्यांची निष्ठा महाराष्ट्रातील जनतेशी नसून केंद्रातील नेत्यांशी आहे. देवेंद्र फडणवीस संकटाच्या काळातही राजकारण करत आहेत, असे काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या आणि मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपाल महोदयांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधत विविध मागण्या करण्यात येत आहेत. तर भाजपकडून 22 मे रोजी महाराष्ट्र बचाव आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. यावरून बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच राज्यात अस्थिरता पसरविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा घणाघात त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन मुंबईत कोरोनाच्या रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत, बेड उपलब्ध नाहीत, लोकांची उपासमार होत आहे, असे आरोप सरकारवर केले आहेत. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 22 मे रोजी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. गेल्या 60 दिवसांत राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असून सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे नागरिकांनीही 22 मे रोजी सकाळी 11 वाजता सरकारचा निषेध नोंदवावा, असे पाटील यांनी म्हटले आहे. भाजपच्या या भूमिकेवरून आता काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे.

भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही
एकीकडे भाजपचे नेते राजकारण करायचे नाही, म्हणून सांगतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते सातत्याने सरकार अडचणीत कसे येईल, हे पाहत आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यावर संकट आले असताना, त्याला सामोरे जायचे सोडून भाजप राजकारण करु पहात आहे. भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही असून ‘महाराष्ट्र बचाव’ नव्हे तर ‘भाजप बचाव’ अशी त्यांची भूमिका असल्याची टीका थोरात यांनी केली.