बाळ बोठेची सलग तिसऱ्या गुन्ह्यात चौकशी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर जिल्हा हादरवून सोडणाऱ्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला तोफखाना पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. बोठेची सलग तिसऱ्या गुन्ह्यात पोलीस चौकशी करत आहेत.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात 30 नोव्हेंबर 2020 रोजी सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात अटकेत असलेल्या बोठेची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात चौकशीसाठी त्याला वर्ग करून घेतले होते. तेथे त्याची पोलीस कोठडी संपल्याने तोफखाना पोलिसांनी पारनेर न्यायालय व जिल्हा न्यायालयात अर्ज करून बोठेची खंडणीच्या गुन्ह्यात चौकशी करायची असल्याने त्याला वर्ग करून घेतले. 28 डिसेंबरला बोठे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता.