‘चालतं-फिरतं’ शहर होती जगातील सर्वात जुनी युद्धनौका ‘INS विराट’, ‘इथं’ होईल भंगारमध्ये विक्री

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगातील सर्वात प्राचीन विमान वाहक युद्धनौका आयएनएस विराटला तोडण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल. यास गुजरातच्या अलंगमध्ये तोडले जाईल. वृत्तसंस्था पीटीआयने मंगळवारी एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने असे सांगितले की, आयएनएस विराटला पुढील महिन्यात मुंबईहून गुजरातमधील अलंग येथे नेण्यात येणार आहे. वास्तविक, आयएनएस विराटला तीस वर्षांच्या सेवेनंतर अधिकृतपणे 6 मार्च 2017 रोजीच रिटायर करण्यात आले होते. आता त्यास मोडले जाईल. गेल्या वर्षी जुलैमध्ये केंद्र सरकारने संसदेत म्हटले होते की आयएनएस विराटला स्क्रॅप करण्याचा निर्णय भारतीय नौदलाशी योग्य तो सल्लामसलत करून घेण्यात आला आहे.

1987 मध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आलेल्या प्रदीर्घकाळ काम करणाऱ्या युद्धनौकेस श्री राम ग्रुपने गेल्या महिन्यात मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारा आयोजित एका लिलावात 38.54 कोटी रुपयात खरेदी केले होते. कंपनीचे अध्यक्ष मुकेश पटेल म्हणाले की, शक्यतो मुंबईतील नेवल डॉकयार्ड येथून पुढील महिन्यात अलंग येथील ब्रेकिंग यार्डात पाठवले जाईल.

आयएनएस विराट हे भारताचे दुसरे विमान वाहक जहाज आहे, ज्याने भारतीय नौदलामध्ये 30 वर्षे सेवा बजावली आहे. यापूर्वी या युद्धनौकेने ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये 25 वर्षांपर्यंत सेवा बजावली. ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ हे त्याचे ध्येय वाक्य होते. याचा अर्थ असा आहे की, ‘ज्याचा समुद्रावर ताबा आहे तोच सर्वात शक्तिशाली आहे.’

चालते-फिरते शहर

आयएनएस विराट एक प्रकारचे चालते-फिरते शहर होते. यामध्ये ग्रंथालय, जिम, एटीएम, टीव्ही आणि व्हिडिओ स्टुडिओ, रुग्णालय, दंत उपचार केंद्र आणि गोड्या पाण्याच्या डिस्टिलेशन यंत्रासारख्या सुविधा होत्या. 226 मीटर लांब आणि 49 मीटर रुंद असणाऱ्या आयएनएस विराटने भारतीय नौदलात सामील झाल्यानंतर जुलै 1989 मध्ये पहिल्यांदा श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी ऑपरेशन ज्युपिटरमध्ये भाग घेतला होता. तसेच 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला झाल्यानंतर ऑपरेशन पराक्रम मध्ये देखील विराटची भूमिका होती. विराटने समुद्रात सहा वर्षांहून अधिक काळ घालवला. या दरम्यान, त्याने जगाच्या 27 फेऱ्या मारण्यासाठी 1,094,215 किलोमीटरचा प्रवास केला.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आयएनएस विराटच्या नावाचा समावेश आहे. हे जगातील एकमेव जहाज आहे जे इतके जुने असूनही वापरले जात होते आणि अधिक चांगल्या स्थितीत देखील होते. यास ‘ग्रेट ओल्ड लेडी’ म्हणून देखील ओळखले जाते. वेस्टर्न नेवल कमांडने एकदा सांगितले होते की ते इतिहासातील सर्वात अधिक काळ सेवा देणारे जहाज आहे.