तळेगाव ढमढेरेत सापडला ७०५ वर्षांपूर्वीचा शिलालेख

पुणे : पोलीसनामा

पुण्याजवळील तळेगाव ढमढेरे येथे एका गढीच्या जागेवर खोदकाम करत असताना रामदेवराव यादवकालीन ७०५ वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडल्याची माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि प्रा. डॉ. पद्माकर गोरे यांनी दिली आहे. या शिलालेखामुळे पुण्यासह राज्याच्या १२ व्या, १३ व्या शतकातील इतिहासावर नवा प्रकाश पडणार आहे. ७० वर्षांपूर्वी तळेगावमध्ये राष्ट्रकुट राजा पहिला कृष्ण याचा इसवी सन ७६८ मधील ताम्रपट सापडला होता.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b341e67a-a815-11e8-a35f-ed639ddcced8′]

तीनशे-चारशे वर्षांपूर्वी तळेगाव ढमढेरे हा कसबा होता. त्या भागातील एक महत्वाचे धार्मिक, राजकीय आणि व्यापारी केंद्र होते. या गावात अनेक ऐतिहासिक घराण्यांमध्ये ढमढेरे घराण्याचा मोठा सहभाग होता. सापडलेल्या शिलालेखा बाबात माहिती देताना बलकवडे म्हणाले, या शिलालेखावर शके १२३५ प्रभादी नामसंवत्सरे म्हणजेच इ. स. १३१३ असा काळ नमूद करण्यात आला आहे. लेखात रामदेवराव यादवाचा प्रताप चक्रवर्ती रामचंद्र देव असा उल्लेख असून रामचंद्र यादवांचा महामंडलेश्वर म्हणजेच स्थानिक प्रांत अधिकारी श्री. सामळ सदू आणि स्थानिक पारनेर संघाचा कारभारी गोदाई नाईकाचा उल्लेख आहे. हा शिलालेख या परिसरात एखाद्या मंदिराच्या निर्मितीनंतर त्याच्या निर्मितीकत्र्याने कोरलेला आहे. या मंदिराचे रक्षण करण्यासाठी गद्यगळ स्वरूपात लोकाज्ञा म्हणून आहे.

इ.स. १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीच्या रामदेवराव यादवावर आक्रमण करून त्याचा पराभव केला. खिलजी याची स्वारी हीच दक्षिण भारतावरील पहिले इस्लामिक आक्रमण होते. रामदेवरावाच्या पराभवानंतर हळूहळू यादवांची सत्ता लयाला जाऊन संपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतावर इस्लामची सत्ता प्रस्थापित झाली. त्याच काळामध्ये या मंदिराचा विध्वंस झाला असावा. त्या मंदिराच्या निर्मितीनिमित्ताने कोरलेला हा शिलालेख तत्कालीन परिस्थितीत जमिनीत गाडला गेला असावा. या शिलालेखावरून रामदेवराव यादवाचा पराभव झाला असला तरी इ.स. १३१३ पर्यंत पुणे परिसरावर यादवांचीच सत्ता असल्याचे सिद्ध होते.