चंद्रपूर : ‘कोरोना’ रूग्णांच्या ब्रेकफास्टमध्ये उंदराची विष्ठा अन् आळया, प्रशासनामध्ये खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   महाराष्ट्र राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणं आढळलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले जात असून त्यांची आरोग्याची काळजी घेतली जात आहे. तसेच त्यांची नाष्टा आणि जेवणाची देखील सोय केली जात आहे. मात्र,चंद्रपूर शहरातील विलगीकरण केंद्रातीत कोरोनाबाधित रुग्णांच्या नाश्त्यात अळ्या आणि उंदराची विष्ठा आढळल्याने खळबळ माजली आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने एका रूग्णाने व्हिडीओ व्हायरल केला आहे.

चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विलगीकरण केंद्रामध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अपुर्‍या सुविधांमुळे विलगीकरण केंद्रातील रुग्ण अगोदरच त्रस्त आहेत. त्यात आता नाश्त्यात अळ्या सापडल्याने रुग्णांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

वारंवार तक्रारी करूनही व्यवस्थेत सुधारणा होत नाही. अखेर एका रुग्णाने स्वतः पुढाकार घेऊन या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने याप्रकरणी दखल देण्याची मागणी देखील केली आहे. या व्हायरल व्हिडीओतून कोरोनाबाधित रुग्णांना किती निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते, हे समोर आले आहे. ‘तो’ व्हिडीओ आता सोशल मीडियात आणखी व्हायरल होत आहे.

दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 300 च्या वर गेली आहे. तर अद्याप 747 नुमने प्रतीक्षेत आहेत. 184 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लॉकडाऊनमुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे करता आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रपूर शहरात येण्यास लोकांना मज्जाव असल्यामुळे नवीन रुग्ण दाखल होण्याची शक्यता कमी झाली आहे. तर प्रशासनाला बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोतं झाल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही मुख्यतः जिल्ह्याच्या बाहेरून येणार्‍या आणि त्यांच्या संपर्कात येणार्‍या लोकांमुळे वाढलीय. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 90 हजार लोकं हे बाहेरील जिल्ह्यातून दाखल झाले असले तरी यामुळे कोरोनाचे समूह संसर्ग झालेला नाही.

पण, अशाप्रकारे बाहेरील जिल्ह्यातून येणार्‍या लोकांचा रोख कायम राहिल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे,असे दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळातही बाहेरून येणारी संख्या थांबविता आली. याचा ही फायदा पुढील काळात कोरोनाचा अटकाव करण्यात होत आहे.