बैठकीत असं ‘काय घडलं’ होतं ज्यामुळे अजित पवारांनी पुकारले ‘बंड’, जाणून घ्या…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : २२ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु यामागे असे काय घडले होते की अजित पवारांनी इतक्या तातडीने एका रात्रीत इतका मोठा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. खरंतर दिवसाच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एक महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीत काही घडमोडी घडल्या आणि या बैठकीनंतर अजित पवारांनी बंड करण्याचा निर्णय घेतला. असे उघड झाले आहे.

या बैठकीची सविस्तर माहिती म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकासआघाडीचे काही महत्वाचे नेते उपस्थित होते. ही बैठक मुंबईत नेहरु सेंटर येथे पार पडली होती. या बैठकीत अनेक गोष्टींबद्दल चर्चा झाल्या असून त्यात शरद पवार आणि काँग्रेस नेते यांच्यात वाद झाल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समोर आले आहे. या वादाचे कारण म्हणजे काँग्रेसला अध्यक्षपद देण्याचे शरद पवारांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत म्हटले होते. आणि हाच मुद्दा अहमद पटेल यांनी लावून धरला होता. त्यांना मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील साथ दिली असता पुन्हा पुन्हा तोच मुद्दा समोर येत असल्याने या वादाचा आवाका वाढला होता.

विशेष म्हणजे या बैठकीत उद्धव ठाकरे आणि त्यांचे काही नेते देखील उपस्थित होते अशात शरद पवारांना जाब विचारण्याला काँग्रेस नेत्यांकडून वारंवार प्रयत्न केले जात होते. आणि सर्वांसमोर खरगे आणि पटेल यांनी हा मुद्दा लावून धरल्याने आपला अवमान होतोय असे शरद पवारांना वाटले. यामुळे शरद पवार त्याच क्षणी बैठकीतून बाहेर पडले आणि युती होण्याला त्यांनी नकार दिला तसेच आपले मार्ग वेगवेगळे असल्याचे त्यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितले.

या बैठकीत अजित पवार देखील उपस्थित होते. हे सगळे प्रकरण पाहता अजित पवार चांगलेच संतापले असून त्यांनी ही टोकाची भूमिका घेण्याचे ठरवले होते. विशेष म्हणजे या वादातून पवार यांनी महाराष्ट्रविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या सगळ्या घडामोडींना वैतागून अजित पवारांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

शरद पवार यांनी नुकतीच एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत मुंबईतील नेहरू सेंटर येथे झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांसोबत वाद झाला आणि मी बैठकीतून बाहेर पडलो असे सांगितले. यावरून अजित पवारांचे बंड सर्वांसाठी आश्चर्याचा विषय होता त्याचे कारण अखेर बाहेर आले.

Visit : policenama.com