Inside Story : सांगलीत नेमकं काय घडलं ? भाजपकडे बहुमत असूनही राष्ट्रवादीचा महापौर कसा निवडून आला ?

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपचं संख्याबळ जास्त होतं, त्यांचे नगरसेवक अधिक होते, तरी प्रत्यक्षात या महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर निवडून आला. हे कसं शक्य झालं ?

सांगली मिरज कुपवाड महापालिकेत एकूण 78 जागा आहेत. मंगळवारी महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक पार पडली. महापालिकेत 78  पैकी सर्वाधिक म्हणजेच 41 जागा या भाजपकडे आहेत. काँग्रेसकडे 19 तर राष्ट्रवादीकडे 15 जागा आहेत. तरीही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांनी बाजी मारली. भाजपला धक्का देत राष्ट्रवादीनं विजय मिळवला. भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा अवघ्या 3 मतांनी पराभव झाला.

कोरोनामुळं या निवडणुकीसाठीचं मतदान हे सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीनं झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजपची 5-6 मतं फोडण्यात यश आलं. काही नगरसेवक तर शेवटपर्यंत नॉट रिचेबल राहिले ज्याचा फायदा हा राष्ट्रवादीला झाला. 2 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं आघाडीच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली  तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना 36 मतं मिळाली. दिग्विजय सुर्यवंशी यांनी 3 मतांनी धीरज सुर्यवंशी यांचा पराभव केला आणि ते महापौर झाले.

नेमकं काय घडलं ?
भाजपच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केलं. भाजपचे विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम आणि नसीमा नाईक या भाजपा नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना मतदान केलं. यामुळं राष्ट्रवादीचा मार्ग आणखी सोपा झाला.

खास बात अशी की, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी जातीनं लक्ष घालत प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांच्या होम ग्राऊंडवर अखेर त्यांनी बाजी मारली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजपची मदार होती. परंतु चंद्रकांत पाटलांना गड राखूनही खुर्ची मिळवायला काही जमलं नाही. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा जोरदार धक्का असल्याचंही बोललं जात आहे.