शिवसेना भाजप युती : ‘त्या’ जागेवरून तिढा कायम

मुंंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना-भाजप यांच्यात अद्यापही युतीचा तिढा सुटलेला दिसत नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसनेने पालघरच्या जागेचा आग्रह धरला आहे तर दुसरीकडे भाजपाने बारमतीचा प्रस्ताव दिल्याचे समजत आहे आणि याच मुद्द्यावरून युतीचे घोडे अडल्याचे दिसत आहे.

गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे बारामतीमधून लढल्या आणि विजयी झाल्या. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध रासपाचे महादेव जानकर लढले होते. त्यावेळी जानकर यांना पराभव पत्करावा लागला होता. परंतु त्यावेळी भाजपाचा असा आग्रह होता की, त्या वेळीच त्यांनी कमळ चिन्हावर लढावे. परंतु जानकरांनी ते मान्य केले नव्हते. या वेळी जानकर उभे राहण्याची शक्यता नाही असेही समजत आहे. राज्यमंत्री असलेले पुरंदरचे आ. विजय शिवतारे यांना बारामतीत उतरविले तर ते सुळे यांना जोरदार टक्कर देऊ शकतील म्हणूनच शिवसेनेने बारामतीची जागा लढवावी असे भाजपाचे म्हणणे असल्याचे समजत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एकीकडे भाजपाला वाटत आहे की शिवसेनेने बारमतीची जागा लढवावी तर दुसरीकडे शिवसेना मात्र पालघरच्या जागेवर अडून बसल्याचे समजत आहे. तेथील पोटनिवडणुकीत दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. पण काँग्रेसमधून भाजपात आलेले राजेंद्र गावित यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे तेथून श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी देण्यावर शिवसेना अडून आहे इतकेच नाही तर, आता शिवसेनेला पालघरची जागा हवीच आहे. पालघर सोबतच शिवसेना भिवंडीसाठीही आग्रही आहे जेथे भाजपाचे कपिल पाटील खासदार आहेत. परंतु ती जागा सोडण्यास भाजपा तयार नसल्याचे समजत आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘पालघर नाही, तर युती नाही’, असे शिवसेनेने बजावल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

२५-२३ चा फॉर्म्युला!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा-सेनेची बोलणी आता अंतिम टप्प्यात आहे. भाजपाने २५ तर शिवसेनेने २३ जागा लढवाव्यात असे सूत्र मान्य होऊ शकते. भाजपाने २०१४ मध्ये २६ तर शिवसेनेने २२ जागा लढविल्या होत्या.

…तर पालघर सेनेला

जर पालघरच्या मुद्द्यावरून युती तुटू शकते असे चिन्ह दिसले तर या मुद्द्यावरून युती तुटू नये यासाठी भाजपा पालघरची जागा सेनेसाठी सोडू शकते. दरम्यान असे झालेच तर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला झुकविले असा संदेश यातून शिवसैनिकांमध्ये जाईल, असा मतप्रवाह शिवसेनेत आहे असे समजत आहे.