प्रेरणादायी ! ‘कोरोना’योध्दा असलेल्या पोलिस निरीक्षक पतीचं झालं Covid मुळं निधन; तिसर्‍या दिवसांपासून डॉक्टर पत्नी रूग्णांच्या सेवेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   पती झेवियर रेगो पोलीस क्षेत्रात तर पत्नी मनीषा झेवियर रेगो या डॉक्टर..कोरोनाच्या महामारीत कर्तव्यावर असताना पोलीस निरीक्षक पती झेवियर यांचे निधन झाले. परंतु पत्नी मनीषा रेगो ह्या खासगी प्रसूती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्याने त्यांना थांबणे शक्य नव्हते. आपल्या पतीच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्याचा निश्चय मनाशी बांधत त्या पतीच्या निधनाच्या तिसऱ्या दिवसांपासूनच पतीने सुरु केलेल्या समुपदेशनाच्या सेवेत उतरल्या. त्यांच्या विलगीकरणाचा वेळ संपताच त्या हॉस्पिटलमध्ये आपली सेवा पुन्हा बजावत आहेत.

झेवियर रेगो यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पतीच्या निधनानंतर डॉ. मनीषा यांनी खचून न जाता पतीच्या निधनाच्या तिसऱ्या दिवसांनंतर त्यांचे समुपदेशनाचे कार्य पुढे नेले. आपल्या पतीच्या निधनाचे दुःख पचवणे शक्य नव्हते. स्वतःला कशात तरी व्यस्त ठेवणे आवश्यक होते. त्यातच डॉ. मनीषा यांनी समाज माध्यमांवर कोव्हीड बाबत जनजागृती सुरु केली. या संकटाच्या काळात सकारात्मक राहण्याचे आवाहन करत कोरोनापासून बचावासाठी आणि कोरोना झाल्यावर काय करावे, काय करू नये, यावरून त्या मार्गदर्शक होत्या. आपला १४ दिवसांचा क्वॉरंटाईन काळ संपवून त्या पून्हा लोकांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. डॉ. मनीषा या सध्या बोरीवलीच्या मँटर्निटी होममध्ये कार्यरत आहेत. कोरोना काळात महिन्याला १५ ते २० प्रसूती यशस्वीरित्या करत आहेत. या सेवे बरोबर त्यांचे समुपदेशनाचे कार्य देखील सुरूच आहे.

डॉ. मनीषा रेगो म्हणतात कि, मला थांबून चालणार नाही. सध्या माझ्या सारख्या अनेक डॉक्टरांची रुग्णांंना आवश्यकता आहे. गर्भवती महिलांना तर अधिक आवश्यकता आहे. हे दिवस लवकर जातील. जगावर आलेल्या संकटाचे भान ठेवून नागरिकांनी सकारात्मक राहून जबाबदारीने वागायला हवे. आजही नागरिक निष्काळजीपणे वावरताना दिसत आहे. त्यांनी शासनाच्या नियमाचे पालन करत काळजी घ्यायला हवी. तसेच, नागरिकांनी सहकार्य करायला हवे. सध्या डबल मास्क वापरणे गरजेचे मात्र इथे सिंगल मास्कही लावयला तयार नाही. यात वैद्यकीय रित्या अजून अलर्ट होणे गरजेचे आहे. नकारात्मक विचार करून चालणार नाही. भुतकाळ, भविष्यकाळाच्या विचारात न जगता वर्तमान काळात सकारात्मक विचारांनी राहण्याची गरज असल्याचे डॉ. मनीषा यांनी सांगितलं आहे.

या दरम्यान, पती आणि पत्नी हे दोघेही २४ तास कार्यरत होते. कोरोना महामारीच्या काळात खचलेल्या, नैराश्येत असलेल्या जवळजवळ ७०० कुटुंबांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करत, कर्तव्यापलीकडे जात त्यांच्यापर्यंत झेवियर रेगो आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा यांनी मदत पोहचवली. पोलीस दलात येणाऱ्या नवीन तरुणासाठी ते नेहमीच आदर्श ठरत होते. मागील वर्षी वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना झेवियर रेगो यांना कोरोनाची लागण झाली. तर कोरोना आजाराशी लढताना १३ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले.