अंध महिला व एड्सग्रत मुलांनी अनुभवला ‘सांगीतिक फराळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव , प्रसन्नतेचा उत्सव ,प्रकाशाचा उत्सव मात्र ज्यांचे विश्व स्वतःपुरतेच सीमित आहे आणि दृष्टीअभावी जीवनात कायमचा दाट काळोख आहे अशा समाजापासून दुर्लक्षित असलेल्या अंध महिलांसह एड्सग्रस्त मुलांनी दिवाळीनिमित्त ‘सांगीतिक फराळ’ कार्यक्रम अनुभवला. आपल्याला कुणी तरी विचारात घेतेय या भावनेने या महिलांच्या व मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव आनंदित होते.

निमित्त होते पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकाराने सहकारनगरमधील कै. वसंतराव बागुल उद्यानात आयोजित २० व्या दिवाळी संध्या उपक्रमाचे. माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, सामाजिक कार्यकर्ते अमित बागुल, नंदकुमार बानगुडे, घनःश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, , सागर आरोळे , इम्तियाज तांबोळी आदींसह पदाधिकाऱ्यांनी तसेच शनिवार वाडा रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी नांदेड फाटा येथील शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रमातील महिलांचे आणि गुजरनिंबाळकर वाडी येथील ममता फाउंडेशनमधील एड्सग्रस्त मुलांचे जल्लोषात स्वागत केले.त्यानंतर पाच हजार पणत्या प्रज्वलित करण्यात आल्याने परिसर उजळून गेला.

पर्यावरणाचे जतन करण्यासाठी आतिषबाजी टाळून अंध महिला व मुलांच्या हस्ते केवळ प्रतीकात्मक फुलबाज्या पेटविण्यात आल्या. यानिमित्ताने सारेगमप फेम अभिषेक सराफ , तन्वी दाते , गौरव महाराष्ट्र फेम केतन गोडबोले यांचा उत्सव संगीताचा हा मराठी – हिंदी गाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद आणि नागरिकांच्या अलोट गर्दीने दिवाळी संध्याचा कार्यक्रम रंगत गेला. यावेळी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल म्हणाले कि, दिवाळी म्हणजे दीपोत्सव . बाहेर तर दिवे पेटवायचेच ;पण खरा दिवा हृदयात पेटला पाहिजे. हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटविलेल्या हजारो पणत्या निरर्थक आहेत.

या हेतूने आम्ही हा दिवाळी संध्याचा उपक्रम समाजापासून वंचित असलेल्या, दुर्लक्षित असलेल्या घटकांसाठी घेत असतो. यंदाचे हे २०वे वर्ष आहे. मी समाजाचा, समाज माझ्यासाठी ही भावना जोपासली पाहिजे आणि वंचित घटकांना आपण आधार दिला पाहिजे, त्यांचे जीवन सुसह्य केले पाहिजे.प्रत्येक सणांचा आनंद त्यांना घेता आला पाहिजे ही भावना या उपक्रमामागे असल्याचे त्यांनी सांगितले.