लोकमाता अहिल्यादेवी यांचे कार्य प्रेरणा देणारे : प्रवीण गायकवाड

जेजुरी  : पोलीसनामा ऑनलाइन  –   लोकमाता, धर्मनिष्ठ पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, विशेषतः उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश ,महाराष्ट्र आदी राज्यातील तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी विस्तीर्ण दगडी घाट ,यात्रेकरूंच्या निवासासाठी धर्मशाळा ,पिण्याच्या पाण्यासाठी तलाव, मंदिरांची डागडुजी, ,₹दुरुस्ती आदी लोकहिताची कामे केली. या वास्तू ,मंदिरे ,तलाव आजही सुस्थितीत असून पुढील क्रित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत, विकासाच्या खऱ्या शिल्पकार असलेल्या अहिल्यादेवींचा खंडेरायाच्या जेजुरी नगरीच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. होळकर घराण्यातील अनेक महापुरुषांनी जेजुरी गडकोटांची डागडुजी दुरुस्ती व वास्तूंची निर्मिती केली आहे.गडाच्या पायरीमार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा साकारणे हे त्यांच्या धर्मनिष्ठतेचा गौरव असून राज्यातून देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पर्वणीच आहे. असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले.

मार्तंड देवसंस्थांनच्या वतीने जेजुरी गडाच्या पायरीमार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा सुमारे १२फूट उंचीचा पूर्णआकृती पुतळा साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून हे काम कला संस्कार आर्ट पुणे यांच्या वतीने शिल्पकार महेंद्र थोपटे हे करीत आहेत.

पुतळ्याची पाहणी करण्याकरिता प्रवीण गायकवाड यांचेसह मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजयकुमार ठुबे, देवसंस्थांनचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे ,पंकज निकुडे,अखिल महाराष्ट्र धनगर समाज उन्नती मंडळाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश लेंडे आदी उपस्थित होते.

ब्राँझ या धातूपासून पुतळा साकारला जात असून यासाठी लागणाऱ्या प्रशासकीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकारीसो. पुणे यांच्या परवानगीसाठी पाठपुरावा सुरू आहे. येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत पायरीमार्गावर पुतळ्याचे अनावरण होईल असे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी माहिती देताना सांगितले.