पालकमंत्री समजून उचललं पण नंतर भावाचेच अपहरण करुन मारहाण केल्याचं समजलं

नाना पटोले यांच्या गुंडांने कृत्य केल्याचा आरोप

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साकोली विधानसभा मतदारासंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके हेच आहेत असे समजून गुंडांनी त्यांच्या भावाचे अपहरण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. ही घटना साकोली येथे शुक्रवारी रात्री घडली. काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या गुंडांनी हा प्रकार केल्याचा आरोप होत आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, डॉ. परिणय फुके यांचे लहान भाऊ नितीन फुके हे साकोली येथील प्रकाशपर्व पोस्ट  ऑफिसजवळील राहत्या घरातून रस्त्याने जात असताना नाना पटोले यांचा पुतण्या रिकी पटोले व काही कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि मारहाण करीत वाहनात कोंबले. तेथून ते नितीन यांना पटोले यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तेथेही त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत नितीन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना साकोली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचे अपहरण करुन त्यांना मारहाण करण्याचा डाव रचण्यात आला होता, अशी माहिती पुढे येत आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या नितीन फुके यांनाच अंधारात पालकमंत्री फुके समजून त्यांना घेरण्यात आले आणि मारहाण करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. साकोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीत नाना पटोले हे नागपूरमधुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध उभे होते. तेथे पराभव झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या स्वघरी साकोली येथून विधानसभा निवडणुक लढवत आहेत.

Visit : Policenama.com