पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा भाजपला गोव्यातील सत्ता महत्वाची : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत होत आहे. पण असे असले तरीही पर्रिकरच गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आजारी व थकलेल्या पर्रीकरांवर आता मुख्यमंत्रीपद लादणे हे निर्घृण व अमानुष राजकारण आहे. पण भाजप नेतृत्वाला पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य गमावण्याची भीती वाटत आहे, अशी टीका शिवसेनेने सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bee2c812-c075-11e8-8d41-ff8d9237405c’]

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहतील, नेतृत्वबदल होणार नाही असे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतील इस्पितळात ते कर्करोगावर उपचार घेत आहेत. त्यांच्या गैरहजेरीत गोव्याचे प्रशासन हे ढेपाळले आहे. मुख्यमंत्री हे पक्षाची सोय नसतात, तर राज्याचे गाडे पुढे नेण्याचे काम ते करत असतात. पर्रीकर यांच्या आजारपणामुळे व गैरहजेरीमुळे गोव्यात एकप्रकारे अनागोंदीचे राज्य सुरू झाले आहे. पर्रीकर यांना बदलायचे तर मग त्यांच्या जागी बसवायचे कुणाला? कारण मुख्यमंत्रीपदी बसवता येईल असा एकही लायकीचा माणूस गोवा भाजपात नाही. त्यामुळे आजारी व थकलेल्या पर्रीकरांच्याच पादुका मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर ठेवून सरकार चालवा असा संदेश अमित शहा यांनी दिला आहे. हा निर्णय म्हणजे गोव्याच्या जनतेवर आणि खुद्द पर्रीकर यांच्यावर अन्याय आहे.

[amazon_link asins=’B014HWDD8W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c61017b4-c075-11e8-8df5-636ed24e2782′]

पर्रीकरांवर आता मुख्यमंत्रीपद लादणे हे निर्घृण व अमानुष राजकारण आहे. पर्रीकर यांचा स्वभाव स्वस्थ बसण्यातला नाही, त्यांना विश्रांतीची व उपचारांची गरज आहे, पण दिल्लीच्या इस्पितळातील खाटेवरूनही ते गोव्यात लक्ष ठेवतात, फायलींबाबत विचारणा करतात, नेतृत्वबदलाच्या हालचाली करणार्‍यांशी संवाद साधतात. हा ताणतणाव त्यांच्या सध्याच्या नाजूक प्रकृतीस झेपणारा नाही, पण भाजप हाय कमांडला हे समजवायचे कोणी? त्यांना पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा गोव्यातील सत्ता महत्वाची वाटते. भाजपच्या विजयी नकाशावरील गोवा टिकला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे.

योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्या, मुख्यमंत्र्यांचा निवडणूक कानमंत्र

पर्रीकरांशिवाय त्यांच्या मंत्रिमंडळातील नागरी विकासमंत्री फ्रान्सिस डिसुझा आणि ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर हेदेखील आजारी आहेत. त्यांच्याही बाबतीत कुठलाच निर्णय होत नव्हता. अखेर डिसुझा आणि मडकईकर यांना सोमवारी मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यांच्या जागी भाजपचे नीलेश काब्राल आणि मिलिंद नाईक यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. तेव्हा हे दोन मंत्री आता आजारपणाची विश्रांती घेतील, पण गोव्यात आणखी किती काळ आजारी मुख्यमंत्री ठेवायचा याचाही निर्णय भाजप श्रेष्ठींना घ्यावाच लागणार आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.