संतापजनक ! मिरजमध्ये उपचाराऐवजी 3 रूग्णांना रस्त्यावर फेकलं, एकाचा मृत्यू

मिरज (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन – वैद्यकीय पांढरी म्हणून प्रसिद्ध  असणाऱ्या मिरजमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे.  मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तीन रुग्णांना उपचार न करता सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकून देण्यात आले. नागरिकांच्या जागरूकतेमुळे ही घटना उघडकीस आली. मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला. याबाबत रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिल नरसिंगकर  (रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक) व सागर साळोखे (सफाई कर्मचारी) अशी त्यांची नावे आहेत. यापैकी नरसिंगकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी सांगलीतील जुन्या कुपवाड रस्त्यावर अंधारात तीन अत्यवस्थ रुग्ण पडल्याचे नागरिकांना दिसले. संजयनगर पोलिसांत माहिती देऊन तिघांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. शंकर शिंदे, पीरसाब मोमीन व शिवलिंग कुचनुरे अशी या  रुग्णांची नावे असून त्यापैकी शिवलिंग कुचनुरे यांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर  मिरज शासकीय रुग्णालयातून तिन्ही रुग्णांना दुसऱ्या  रुग्णालयात नेत असल्याचे सांगून, सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकल्याची माहिती समोर आली. याबाबत अत्यवस्थ रुग्णांना विनापरवाना बाहेर टाकणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता भोसले यांनी शुक्रवारी रात्री गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर दोषी दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Visit : Policenama.com