मुंबईत संस्थांकडून शिक्षकांना शाळेत येण्याचा तगादा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिक्षकांना शासनाने घरून काम करण्याची मुभा दिली आहे. असे असतानाही मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरांतील शिक्षकांना संस्था शाळेत बोलवित असल्याचा आक्षेप शिक्षक संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे अनेक शिक्षक कोरोनाच्या विळख्यात सापडत असून नुकतेच पाच शिक्षकांचे निधन झाले आहे. त्यामुळे शिक्षकांना घरूनच काम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, हृदयविकारग्रस्त तसेच 55 वर्षांवरील शिक्षकांना शाळेत बोलावू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही संस्था शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती करत आहेत. ‘राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांचे कोरोना संसर्गाने मृत्यू झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत पाच शिक्षकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. अनेक शिक्षक करोना संक्रमित आहेत. शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षकांना अनेकदा तास-दोन तासांच्यावर प्रवास करावा लागत आहे. या सगळ्यात शिक्षकांना मानसिक, शारीरिक त्रास होत आहे. त्याचबरोबर आर्थिक ताणही येत आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती करण्यात येऊ नये,’ अशी निवेदने शिक्षक संघटनांनी शासनाला दिली आहेत.