सीबीआयसारख्या संस्था उद्धवस्त होत आहेत : मनमोहन सिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआयसारख्या संस्था मोदी सरकारच्या काळात उद्धवस्त होत असल्याची खंत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे. शशी थरूर यांच्या द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. सिंग यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील विविध घटनांचा उल्लेख करत मोदी सरकारवर निशाणा साधला. सांप्रदायिक हिंसाचार, मॉब लिचिंग आणि गोरक्षकांकडून होणारा हिंसाचार आदी मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी मौन बाळगून आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थेमध्ये सुरू असलेल्या वादावर बोलताना डॉ. सिंग म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात देशातील विद्यापीठे आणि सीबीआयसारख्या राष्ट्रीय संस्थांमधील वातावरण बिघडले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी देशाचे १४वे पंतप्रधान म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी भारतीय जनतेला अनेक आश्वासने दिली. मात्र, मोदी आणि त्यांच्या सरकारने आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे जनतेचा विश्वासघात केला आहे.

शशी थरुर यांनी अप्रतिमरित्या हे पुस्तक लिहिले आहे. आपण सर्व भारतीयांचे पंतप्रधान आहोत असे नरेंद्र मोदी म्हणत असतात. मात्र, सांप्रदायिक हिंसा, गोरक्षा आणि मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर ते काहीच न बोलता मौन बाळगतात, असे म्हणत सिंग यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

मोदींची ‘फेकॉलॉजी’ आता नवीन राहिलेली नाही : सुशीलकुमार शिंदे