नातेवाईकांच्या संमतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करा : आयसीएमआर

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह घेण्यास काही कारणास्तव नातेवाईक येऊ न शकल्यास किंवा त्यांनी नकार दिल्यास संमतीने आणि पोलीस, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मृतदेहावर रुग्णालयाने अंत्यसंस्कार करण्याची सूचना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केली आहे.

देशभरात कोरोना संसर्गाच्या भीतीने काही वेळेस नातेवाईक मृतदेह नेण्यासाठी येत नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय नातेवाईक विलगीकरणामध्ये असल्याने त्यांना येणे शक्य नसते. मात्रा, कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांचे मृतदेह फार काळ ठेवणे असुरक्षित आहे. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासन, पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांची समंती घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करणयाचा निर्णय रुग्णालयांनी घेण्याचे आयसीएमआरच्या नियमावलीत नमूद केले आहे.

मृतदेह जाळणे किंवा पुरण्याची परवानगी दिलेली असली तरी मृतांची संख्या मोठया प्रमाणात असल्यास लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यातील कोणता पर्याय निवडण्याची परवानगी द्यायची हे ठरविण्याची मुभा सरकारला असेल असेही नियमावलीत स्पष्ट केले आहे. रुग्णाचा मृत्यू संशयास्पद कारणामुळे झाला असल्यास किंवा न्याय वैद्यकीय प्रकरण असल्यास विशेष काळजी घेऊन शवविच्छेदन केले जावे. मृत व्यक्ती बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली असल्यास किंवा कोरोनाची लक्षणे असल्यास शवागारात मृतदेह पाठविण्यापूर्वी अशा व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पाठवावेत. तसेच चाचणी अहवाल येईपर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करू नये.